शेतातील हातभट्टीवर धाड
By admin | Published: February 13, 2017 12:22 AM2017-02-13T00:22:42+5:302017-02-13T00:22:42+5:30
शेतात हातभट्टी लावून त्यातून दारू गाळत असताना धाड घालून पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
परसवाडा : शेतात हातभट्टी लावून त्यातून दारू गाळत असताना धाड घालून पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. दवनीवाडा पोलिसांनी बुधवारी (दि.८) गोंडमोहाडी येथे ही कारवाई केली असून ७३ हजार ५०० रूपयांचा माल जप्त केला.
महालगाव निवासी महेश बेनिराम नागपूरे (३१)व बोरा निवासी शिशुपाल कांतालाल कुतराहे (४०) हे दोघे गोंडमोहाडी परिसरातील नाल्याच्या काठावार भट्टी लावून दारू गाळत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घालून दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ८० लीटर मोहफुलाची दारू, ड्रम, नेवार पट्टी, टवरा, पाईप, जळाऊ काड्या, ८० किलो मोहफुल व एक हजार किलो सडवा मोहा असा एकूण ७३ हजार ५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. ठाणेदार वामन हेमणे यंच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली असून तपास पोलीस उप निरीक्षक देव, हवालदास बावनकर व शिपाई साखरे करीत आहेत. (वार्ताहर)