पाण्याच्या शोधात वानरांचा वस्तीत हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:17 AM2018-06-01T00:17:03+5:302018-06-01T00:17:03+5:30
उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या गावाच्या चारही बाजूला जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे बाराही महिने गावशेजारी वानरांचे कळप पाहायला मिळतात.
यावर्षीच्या कडक उन्हाने तसेच जंगल भागात पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे पानवठे नसल्याने पाण्याच्या शोधात वानरांच्या कळपाने भरवस्तीत मोर्चा वळवला आहे. परिणामी कौलारु घरांचे अतोनात नुकसान होत आहे.
वनविभागाने जंगली प्राण्यांसाठी तसेच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सुरुवातीलाच सोय केली असती तर वन्य प्राण्यांनी गावाकडे धाव घेतली नसती. तसेच जंगलातील पशु पक्षांना पाण्याअभावी जिव गमवावा लागला नसता. याप्रकरणाकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
एक आठवड्यापासून राणी दुर्गावती चौकातील लोकांच्या घरावर वानरांनी ठाण मांडले आहे. दुपारच्या सुमारास वानवरांचे कळप पिण्याच्या पाण्यासाठी येतात.
एका घरावरुन दुसऱ्या घरावर उड्या मारतांना कौलाची तुटफूट होवून घरमालकांचे मोठे नुकसान होते. याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकºयांनी केली आहे.