प्रेयसीच्या हत्येनंतर गळफास; चौकशीसाठी चौघे पोलिस ठाण्यात
By नरेश रहिले | Published: December 25, 2023 03:22 PM2023-12-25T15:22:07+5:302023-12-25T15:22:12+5:30
पुराडा येथील प्रेमीयुगूल मृत्यू प्रकरण :परिसरात विविध चर्चेला उधाण
गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२, रा. हलबीटोला, ता. देवरी, जि. गोंदिया) या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) याने आत्महत्या केल्याचे सालेकसा पोलिसांनी नमूद केले. परंतु या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी चार तरुणांना चौकशीसाठी सालेकसा पोलिस ठाण्यात बोलावल्याने परिसरात अनेक शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.
टिकेश्वरीच्या आईने सालेकसा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण केल्यावर त्या तिघी माय-लेकी एकाच खोलीत झोपी गेल्या. आई आणि बहिणीसाेबत झोपलेली टिकेश्वरी अचानक रात्री गायब झाली. २३ डिसेंबर रोजी सकाळी ती अंथरुणावर दिसली नाही. ती शौचास गेली असावी, असा आईचा समज झाला. परंतु उशीर होऊनही ती घरी न परतल्यामुळे आईची चिंता वाढू लागली. तिच्या शोधासाठी आई गावात गेली; परंतु त्यांना मुलगी दिसली नाही. सकाळी १०:३० वाजता फिर्यादीचा नातू नरेश संतोष मिरी याने टिकेश्वरीची आपल्या मोबाइलवर फोटो दाखवून ती पुराडा परिसरातील शेतात मृत पावल्याची माहिती दिली.
जेवण केल्यावर आपल्या आई आणि बहिणीसोबत झोपी गेलेल्या टिकेश्वरीचा रात्रीच खून होतो, ही बाब अनेकांना पचनी न पडणारी झाली. टिकेश्वरीच्या आईच्या तक्रारीवरून मृतक श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या घरापासून तब्बल ८ किलो मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
मुलाच्या सोबत जाणाऱ्या मंडळींना पोलिसांनी बोलाविले
श्रीकांत रात्रीच्या वेळी एकटाच गेला नाही. त्याच्या सोबत मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या चार लोकांना सालेकसा पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. परंतु ही चौकशी कोणत्या दिशेने होत आहे, यासंदर्भात पोलिसांनी गुप्तता पाळली असली तरी श्रीकांतने टिकेश्वरीचा खून करून स्वत: आत्महत्या केली की, त्या प्रेमीयुगुलांचा खून करण्यात आला या दोन्ही बाजूने तपास होणे गरजेचे आहे. त्या तरुणाची आत्महत्या नसल्याची चर्चा देवरी तालुक्यात आहे.