एटीएममध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2017 12:47 AM2017-02-01T00:47:03+5:302017-02-01T00:47:03+5:30
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केवळ शोभेची
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केवळ शोभेची वस्तू बनली असून एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे.
या एटीएममधून पैसे निघण्याऐवजी केवळ स्लीप बाहेर पडते. त्यामुळे एटीएम कार्डधारकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. नोटबंदीनंतर बराच कालावधी लोटूनही बँकेच्या ग्राहकांना मोठाच त्रास सहन करावा लागत असल्याने ‘अच्छे दिन’ या शासनाच्या घोषणेचा बट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.
मागील ९ नोव्हेंबरला केंद्र शासनाने पाचशे व एक हजाराचे नोट चलनातून बंद केले होते. तेव्हापासून बँकेमध्ये लोकांची गर्दी वाढली होती. त्याचा फटका ग्रामीण भागावरसुध्दा बसला होता. नोटबंदीमुळे अनेक लोकांचे आर्थिक व्यवहार बिघडले आहेत. आजही ग्राहकांना दहा हजाराच्या वर रक्कम मिळत नाही. तर बँक आॅफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे एका एटीएमची सुविधा असून एटीएमध्ये पैसे नसल्याने एटीएम कार्ड धारकांचे कार्ड कुचकामी ठरत आहेत.
बँकेच्या व्यवस्थापकांना याबद्दल विचारणा केली असता बँकेत पैसे नसल्याचे सांगितले. एटीएममध्ये पैसे केव्हा टाकणार? ग्राहकांचा त्रास केव्हा कमी होणार? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. (वार्ताहर)