२७ ग्रामपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:03+5:302021-01-19T04:31:03+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र यापैकी आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रत्यक्षात ...
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र यापैकी आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. याचे निकाल सोमवारी जाहीर झाले त्यात यात आजी-माजी आमदारांनी आपल्या गावात व क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र आहे, तर २७ ग्रामपंचायतींवर कुठल्याच पक्षाला स्पष्ट कौल न मिळाल्याने त्रिशंकु चित्र आहे.
जिल्ह्यातील एकूण १८१ जागांपैकी ८३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर ७१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन केले असून, २७ ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र पाहता महाविकास आघाडी काठावर पास झाली असून, त्या तुलनेत भाजपचे प्रदर्शन चांगले राहिले. गोंदिया तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी १४ भाजप, ८ काँग्रेस-राकाँने आणि अपक्षांनी १५ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांना १४ ग्रामपंचायतीवर तर माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना सुद्धा ग्रामपंचायतींवर आपले उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा या तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजपला फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले. गोरेगाव, आमगाव तालुक्यात महाविकास आघाडीला कल मिळाला, तर सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी वर्चस्वाचे दावे केले आहेत. मात्र याचे खरे चित्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
......
माजी मंत्र्यांनी राखला गड
सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी ग्रामपंचायत ही माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या गृहक्षेत्रात येते त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण नऊ सदस्यांपैकी पाच भाजप समर्थित सदस्य निवडून आल्याने माजी मंत्र्यांनी गड राखल्याची चर्चा आहे.
......
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
तालुका ग्रामपंचायतींची संख्या
गोंदिया ३७
सडक अर्जुनी ३७
गोरेगाव २५
तिरोडा १८
अर्जुनी मोरगाव २५
देवरी २७
आमगाव २१
सालेकसा ०९
.......................
एकूण १८१