हनुमान चौक रस्त्याचा वाद चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:31 PM2019-07-28T23:31:52+5:302019-07-28T23:32:54+5:30
इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत या रस्त्याचा सोक्षमोक्ष न लागल्यास ३१ तारखेपासून हनुमान मंदिरासमोर धरणे व साखळी उपोषण करणार असा इशारा नगरसेविका भावना कदम व अफसाना पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
इंगळे चौक ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. दुर्गा कंस्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले असून त्यांच्या मार्फत अन्य कंत्राटदार या रस्त्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. करण्यात आलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी रस्त्याचे बांधकाम बंद केले होते. मात्र मध्यंतरी पुन्हा हनुमान मंदिर ते शासकीय निवासस्थान पर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. सध्या ते कामही बंद दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील हा मुख्य रस्ता असून या मार्गानेच सामान्य नागरिकांसह रूग्ण व रूग्णवाहिकांची ये-जा असते.असे असतानाही मागील तीन महिन्यांपासून रस्ता बंद आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेत प्रभागाच्या नगरसेविका कदम व पठाण यांनी गुरूवारी (दि.२४) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ३० तारखेपर्यंत योग्य ती कारवाई करावी अन्यथा ३१ तारखेपासून हनुमान मंदिर समोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या आहेत नगरसेवकांच्या मागण्या
सदर रस्त्याचे काम करारनामा व अंदाजपत्रकानुसार होत आहे काय याचा अहवाल प्राप्त करावा, अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याने लेव्हल नसून लोकांच्या घरासमोर पाणी साचून राहत आहे. त्यामुळे कामावरील कॉँक्रीटचे परिक्षण तपासून अहवाल द्यावा, या रस्त्यावरील नाली कंत्राटदाराने बुजवून टाकली असून नवीन नालीचे बांधकाम त्वरीत सुरू करावे, हनुमान मंदिर ते महिला समाज भवनपर्यंत खोदकाम झाले असून बंद असलेले काम त्वरीत सुरू करावे तसेच येथेही नवीन नालीचे बांधकाम करावे, महिला समाज भवन ते नेहरू चौकापर्यंत काम त्वरीत सुरू करावे, प्रभाग क्रमांक ६ मधील मंजूर विविध कामांची निविदा त्वरीत काढून मागणी असलेल्या कामांना त्वरीत मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, यातील दोषी व्यक्ती व संबंधित अधिकाºयांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे.