जिल्हावासीयांसाठी ‘हॅप्पी सॅटरडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:09+5:302021-06-06T04:22:09+5:30
गोंदिया : मागील दोन-अडीच महिने कहर केल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे. यामुळेच आता बाधितांची संख्या खालावत चालली ...
गोंदिया : मागील दोन-अडीच महिने कहर केल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे. यामुळेच आता बाधितांची संख्या खालावत चालली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात केवळ १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० मार्च रोजी जिल्ह्यात १० बाधितांची नोंद घेण्यात आली होती. म्हणजेच, सुमारे ८५ दिवसांनी जिल्ह्यात शनिवारी सर्वात कमी बाधित आढळून आल्याने जिल्हावासीयांसाठी ‘हॅप्पी सॅटरडे’च ठरला.
जानेवारी महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोके वर काढले होते. नागपूरपासून याची सुरुवात झाली व हळूहळू जिल्हाही त्याच्या विळख्यात आला होता. मार्च महिना अर्धा निघाल्यानंतर कोरोनाने आपले पाय पसरले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला होरपळून काढले होते. त्याची झळ आतापर्यंत सहन करावी लागत असून, नवीन बाधितांची संख्या आजही खाली-वर होत आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरत आहे हे नक्की. परिणामी जिल्ह्यातील दैनंदिन जीवन सुरळीत होताना दिसत आहे. असे असतानाच शनिवारी (दि.५) जिल्ह्यात फक्त १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मागील आकडेवारी बघितली असता १० मार्च रोजी जिल्ह्यात १० बाधितांची नोंद घेण्यात आल्याचे दिसते. म्हणजेच, तब्बल सुमारे ८५ दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात एवढी कमी आकडेवारी नोंदविता आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीत सातत्याने घट होत असल्याचे बघून सर्वांनाच दिलासा मिळत आहे. अशात शनिवारचा (दि.५) हा दिवस जिल्हावासीयांसाठी नक्कीच ‘हॅप्पी सॅटरडे’ ठरला.
----------------------------------
२२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
शनिवारी जिल्ह्यात १४ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असल्याने जिल्हावासीयांच्या डोक्यावरील टेन्शन आता हळूहळू कमी होत चालले आहे. सुमारे ३ महिने कोरोनाच्या दडपणात असल्याने कित्येकांच्या मनात आजही एक दहशत निर्माण झाली आहे. मात्र शनिवारची आकडेवारी सर्वांनाच सुखद ठरली. त्यात २२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आणखीच दुधात साखर पडली आहे.
--------------------------
नियम पाळा, कोरोना टाळा
कोरोनाची दुसरी लाट आता आपल्या जिल्ह्याचा पिच्छा सोडत असल्याचे दिसत आहे. यात नागरिकांनी दिलेले समर्थन हेसुद्धा त्याला कारणीभूत आहे. मात्र, यापुढेही आपल्या जिल्ह्याला कोरोनाच्या कचाट्यातून दूर ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी नियम पाळण्याची गरज आहे.