शिवमंदिरात हर हर महादेवचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:21+5:30
महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर्षात साधारण १२ ते १४ शिवरात्री असतात, या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात तालुक्यातील नागरा, पिंडकेपार, शिवधाम व कामठासह जिल्ह्यातील शिवमंदिरात मंगळवारी (दि. १) पहाटेपासूनच महाशिवरात्रीनिमित्त पूर्जाअर्चा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रांवर बंदी लादली होती. मात्र, पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली होती, त्यामुळे भाविकांनी सकाळपासून जिल्ह्यातील विविध शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.
महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर्षात साधारण १२ ते १४ शिवरात्री असतात, या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असते. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शिव मंदिरांमध्ये ‘हर हर महादेव’चा गजर सुरू झाला. भाविकांनी सकाळीच नागरा, कामठा, शिवधाम, पिंडकेपार, पोंगेझरा येथील शिव मंदिर गाठून मनोभावे पूजाअर्चा करून परिवारासाठी मंगलमय कामना केली. या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर व्यवस्थापन समित्यांनी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात चोख व्यवस्था केली होती.
नियमांचे पालन करीत दर्शन
- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने काळजी घेतली होती. मंदिर परिसरात भाविकांना मास्क तसेच आवश्यक नियमांचे पालन करण्याच्या सूचना सेवक करीत होते.
महाप्रसादाचे वितरण
- नागरा, कामठा, शिवधाम येथील मंदिर परिसरात विविध सामाजिक संस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काही संस्थांनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.