'फ्लॅटसाठी माहेरून १० लाख आण' म्हणत विवाहितेचा छळ; नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार
By नरेश रहिले | Published: December 25, 2023 08:36 PM2023-12-25T20:36:23+5:302023-12-25T20:42:31+5:30
नवऱ्याला भकवणाऱ्या आणखी एकाविरोधातही गुन्हा दाखल
नरेश रहिले, गोंदिया: फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये आण अशी मागणी करत नवरा तिला मारहाण करायचा, गळा दाबायचा, चाकूने मारायचा. केस ओढून तिचे डोके फरशीवर आपटले. वर्षभरापासून छळ सहन करीत असलेल्या पीडितेने अखेर नवऱ्याची पोलिसात तक्रार केली. नवऱ्याला भडकविणारा भासराही आरोपी असल्याने त्या दोघांवर रामनगर पोलिसात २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
तिरोडा तालुक्याच्या करटी (बुज.) येथील आरोपी लक्ष्मण देबीलाल बिसेन (३३) याच्या सोबत गोंदियातील दिक्षाचे ११ जून २०२२ ला लग्न झाले. लग्नानंतर तीन महिने दिक्षा व तिचे पती लक्ष्मण हे पुणे येथे आपल्या ड्युटीवर गेले होते. पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये आण म्हणून नवरा लक्ष्मण देबीलाल बिसेन हा छळ करायचा. भासरा नोकीलाल देबीलाल बिसेन (३९) हा हुंड्यासाठी आपल्या भावाला भडकावत होता. दिक्षाच्या विरोधी समीकरण करण्यात बिसेन कुटुंबिय सक्रीय होते. यातून लक्ष्मण हा दिक्षाला मारहाण करायचा. कधी तिचा गळा दाबायचा, चाकूने मारायला धावायचा, केस ओढून त्याने अनेकदा फरशीवर आपटले. हा अत्याचार करूनही आपल्या आई-वडीलांना सांगू नको अन्यथा तुझी खैर नाही म्हणायचा. दिक्षा हीला ३० ऑगस्ट २०२३ रोजी दिक्षाला लक्ष्मणने माहेरी गोंदियात आणून सोडले. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिक्षाच्या वडीलाघरी येऊन आठ ते दहा लोकांनी धमकी दिली. त्यामुळे दिक्षाच्या वडीलाला हृदयविकाराचा झटका आला. दिक्षाला आरोपी लक्ष्मणने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण भरोसा सेलकडे सोपविण्यात आले. परंतु त्या ठिकाणी दोघांची तडजोड न झाल्याने दिक्षा लक्ष्मण बिसेन (२६) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात आरोपी पती लक्ष्मण देबीलाल बिसेन (३३) व भासरा नोकीलाल देबीलाल बिसेन (३९) दोन्ही रा. करटी (बुज.) या दोघांवर भादंविच्या कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.