अनाथ बालकाचा हरपला नाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:07+5:30

अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले.

Harpala Nath of an orphan child | अनाथ बालकाचा हरपला नाथ

अनाथ बालकाचा हरपला नाथ

Next
ठळक मुद्देगोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सांत्वना भेट : धीर देत दिला आधार

संतोष बुकावन 
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव :  ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा ‘नाथ’ मिळाला. त्याने स्वीकारले. घरपण दिले. माझ्या भविष्याचे स्वप्न रंगवले. सारे काही सुरळीत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला. अन् त्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले. गोंदियाचे जिल्हाधिकारी सुद्धा तेवढेच भावुक. त्यांनीही साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ देत त्या माउलीला जगण्याचे बळ दिले.
अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. 
कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी ती माउली आहे खरी; पण कपाळावरचे कुंकू पुसल्याने तिचे अवसानच गळाले. काय करावे सुचेना. मात्र, प्रशासनातील एक अधिकारी एवढा संवेदनशील असू शकतो,  याचा प्रत्यय त्यावेळी आला, जेव्हा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन येवले यांच्या घरासमोर थबकले. यादरम्यान घरासमोरून कितीतरी पाऊलं, वाहनं गेली असतील; पण ती थबकली नाहीत. 
आल्याआल्याच त्यांनी अगदी सामान्य माणसाप्रमाणे विचारपूस केली. अन्नधान्य विचारलं. चिमुकल्याच्या शिक्षणाचं विचारलं. रोजगाराची काय सोय आहे, तेही विचारलं. यापैकी काय हवंय का? त्याची आस्थेने विचारपूस केली. बहिणीला भावाकडून एक भेट म्हणून साडीचोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ आणले. त्याचा स्वीकार कर, असं अत्यंत भावुक होत बोलले. तिच्या डोळ्यांत दुखाश्रू-आनंदाश्रू तरळले. तिनं सुद्धा जिल्हाधिकारी भावाकडून भेटवस्तू स्वीकारल्या. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे राजेश खवले. त्यांनी तिला धीर दिला व जाताना मला माझ्या भावाने पाठवले आहे. माझे हे काम आहे, त्यात सहकार्य करा, असे सांगत तहसीलदारांकडे जाण्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

प्रशासनाची सहृदयता 
कोरोनात कुणी पती-पत्नी, आई-वडील, मुले गमावली. त्यांच्याप्रति सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघावयास मिळत आहे. येथील तहसीलदार विनोद मेश्राम हे स्वतः कोरोनात जीव गमावलेल्यांना साडीचोळी, पात्र लाभार्थींना कुटुंब अर्थसाहाय्य, मोफत अन्नधान्याचे रेशन कार्ड, निराधार योजनेचे लाभ मिळण्यासाठी त्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच राजोली-भरनोली, मोरगाव, निमगाव, खामखुरा येथे भेट दिली. प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे, याचा प्रत्यय येत आहे.

शासनाने मदत द्यावी
कोरोना महामारीत अनेकांनी घरचे कर्ते पुरुष गमावले. होते नव्हते ते त्याच्या उपचारात खर्ची झाले. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. ज्यांना रोजगार नाहीत, त्यांनी भविष्याची वाटचाल कशी करायची हा यक्षप्रश्न आहे. एकतर कोरोना आजाराचे वेळी रुग्णालयात झालेला आर्थिक खर्च शासनाने द्यावा, ज्या कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबीयांची मागणी आहे.

 

Web Title: Harpala Nath of an orphan child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.