केशोरी येथे लाल मिरची पिकाची तोडणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:44+5:302021-02-25T04:36:44+5:30
केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल ...
केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल मिरची संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या लाल मिरचीला परदेशातही मोठी मागणी असते. सध्या लाल मिरची पीक परिपक्व झाले असून, तोडणीचे काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मिरची शेतात मिरची तोडणाऱ्या महिला दिसून येत असून, यातून अनेक गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
लाल मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास एक महिना सुरु असल्याने यापासून रोजगाराची समस्या मार्गी लागली आहे. केशोरी परिसरातील बहुतांश शेतकरी लाल मिरची पिकाचे उत्पादन घेतात. या परिसराची लाल मिरची उत्पादीत क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. येथील लाल मिरचीला परदेशातून मागणी होते. मात्र, लाल मिरची उत्पादक शेतकरी शासनाकडून नाडला जात आहे. शासन मिरची पिकाला हमीभाव देत नसल्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिरची लागवड खर्च जास्त आहे. मिरची पिकासाठी अत्यंत जिकरीची मेहनत शेतकऱ्यांना करावी लागते. सध्या सप्टेंबर महिन्यात लागवड केलेले मिरची पीक परिपक्व होऊन तोडणीपर्यंत आले आहे. मिरची पिकाच्या तोडणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येथील लाल मिरची तोडण्यासाठी खेड्यापाड्यातून महिला मजूर येत असतात. मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास महिनाभर सुरु असतो. या भागातील मिरची पिकाची ओळख आहे तशीच मागणीसुध्दा आहे. परंतु यावर्षी नेहमी बदलणाऱ्या वातावरणामुळे मिरची उत्पादनात फार मोठी घट सोसावी लागणार आहे. शासनाकडून मिरची पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी फार हताश झाला आहे. या कारणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी मिरची पिकाचे लागवड क्षेत्र कमी करुन मकापीक आणि रब्बी धानाचे पीक लागवड क्षेत्र वाढविले आहे. आता लाल मिरची पिकाची तोडणी जोमात सुरु असून मिरचीच्या शेतात महिला मजूर मिरची तोडताना दिसून येत आहेत.
.....
हमीभाव देण्याची मागणी
शेत जमिनीतील उत्पादीत इतर पिकांना शासनाने हमीभाव देऊन न्याय दिला आहे. त्यानुसार मिरची पिकालाही हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. परंतु अजूनही शासनाने मिरची पिकाला हमीभाव जाहीर केला नाही किंवा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या मिरची पिकाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी शासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.