प्रशासकराज संपण्यापूर्वी बदल्या मार्गी लावण्याची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 05:00 AM2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:01+5:30
जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा कालावधी लोटूनही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्यावर कुठलीच कारवाई सुद्धा करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधी कोरोना आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळपास दोन वर्ष लांबणीवर गेल्या. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. १० मे रोजी जि. प. अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याने प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. पण त्यापूर्वीच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची लगीन घाई जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागाने घोषित केला आहे. जिल्हा परिषदेत १० मे रोजी सत्ता स्थापन होणार असून ५ ते १५ मे दरम्यान बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदल्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नसणार आहे. राज्य शासनाच्या १५ मे २०१४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेत कार्यरत गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ ते १५ मे या कालावधीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गट क आणि ड मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केला आहे.
बदलीनंतरही कर्मचारी एकाच ठिकाणी
- जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा कालावधी लोटूनही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्यावर कुठलीच कारवाई सुद्धा करण्यात आली नाही.
मर्जीतील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांची मेहरबानी
- जिल्हा परिषदेतील बहुतेक विभागात अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणारे काही कर्मचारी आहे. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना रिलिव्ह न करता तेथेच कार्यरत ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या पण,त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ मेहरबान असल्याचे चित्र आहे.
असे आहे कार्यशाळेचे वेळापत्रक
- सामान्य प्रशासन विभागाची कार्यशाळा ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२, वित्त विभाग ५ मे रोजी सकाळी १२ ते दुपारी १, कृषी विभाग ५ मे रोजी १ ते २, लघु पाटबंधारे विभाग ५ मे रोजी दुपारी ३ ते ४, बांधकाम विभाग ५ मे रोजी दुपारी ४ ते ५, पंचायत विभाग ६ मे रोजी सकाळी ११ ते २, महिला बालकल्याण विभाग दुपारी ३ ते ३.३०, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दुपारी ३.३० ते ४, पशुसंवर्धन विभाग मे रोजी ४ ते ४.३०, शिक्षण विभाग (प्राथ.) दुपारी ४.३० ते ६ आणि आरोग्य विभागाची कार्यशाळा ९ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता पर्यंत घेण्यात येणार आहे.