वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे केले तडकाफडकी केले स्थानांतरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 04:41 PM2024-12-06T16:41:37+5:302024-12-06T16:44:50+5:30
प्रसूती दरम्यान गर्भवतीचा मृत्यू प्रकरण : कोरंबीटोला प्राथमिक आरोग्य केंद्र
अमरचंद ठवरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील कोरंबीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती दरम्यान एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ डिसेंबर रोजी घडली होती. गर्भवती महिलेच्या मृत्यूस पीएचसीचे डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवत गावकऱ्यांनी बुधवारी (दि.४) प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. गावकऱ्यांचा रोष पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे यांची व इतर कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.
कोरंबीटोला येथील वसंता धनराज नेताम या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी मंगळवारी सकाळी १०:३० वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकेच्या मदतीने दाखल केले होते. मात्र सकाळी दाखल करण्यात आलेल्या या गर्भवती महिलेवर दुपारी ४ वाजेपर्यंत कुठलाही उपचार करण्यात आला नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येतात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी पीएचसीच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल केले होते; पण तिथून सुध्दा गर्भवतीला सायंकाळच्या सुमारास गोंदियाला रेफर करण्यात आले. गोंदियाला नेत असतानाच वाटेतच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची वार्ता गावात पसरली. यानंतर समस्त गावकऱ्यांनी रात्रीच कोरंबीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत रोष व्यक्त करीत दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
दुसऱ्या दिवशीही गावकरी मागण्यावर राहिले ठाम
मंगळवारच्या रात्री आठ वाजता गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तिचे पार्थिव गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळपासून संतप्त लोकांचा जमाव पीएचसीमध्ये जमा झाला. दोषी डॉक्टरवर कारवाई करा ही मागणी लावून धरली. जोपर्यंत कारवाई केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीय व गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिले.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर झाली कारवाई
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे यांचे बदलीचे आदेश ४ डिसेंबर रोजी काढून त्यांचे स्थानांतर तिरोडा तालुक्यातील वडेगाव प्राथमिक आरोग्य केले. तालुका आरोग्य अधिकारी सुकन्या कांबळे यांनी अधिनस्त असलेल्या पीएससीच्या कर्मचाऱ्यांवर केली. डॉ. आर्या वैद्य ह्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. त्यांचा सेवा समाप्ती कार्यकाळ १८ डिसेंबरपर्यंत आहे. त्यांचे सुध्दा स्थानांतरण केले. आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली राऊत यांची बदली अरुणनगर येथे तर परिचर उमेश बोरकर यांची महागाव येथे बदली केली.
नवीन डॉक्टर झाले रुजू
प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी धाबेपवनी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील हे रुजू झाले हे कोरंबीटोला येथे रुजू झाले. त्यांना सहकार्यासाठी सीएचओची सात दिवसासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. परिचर म्हणून वामन मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.