महिलांच्या कर्तृत्वाला ‘सलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:57 PM2017-12-18T22:57:08+5:302017-12-18T22:59:01+5:30

विविध क्षेत्रात महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य इतरांना देखील प्रेरणा देणारे ठरत आहे.

Hats off to women's credentials | महिलांच्या कर्तृत्वाला ‘सलाम’

महिलांच्या कर्तृत्वाला ‘सलाम’

Next
ठळक मुद्देविविध क्षेत्रातील उत्कृष्ट महिला लोकमत सखी सन्मान अवॉर्डने पुरस्कृत : अंजनाबाई खुणे यांना ‘जीवनगौरव’

गोंदिया : विविध क्षेत्रात महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य इतरांना देखील प्रेरणा देणारे ठरत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत लोकमत सखी मंच व मृणाल कोचिंग क्लासेसच्यावतीने रविवारी (दि.१७) येथील गुरूनानक सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘लोकमत सखी सन्मान अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांना प्रदान करण्यात आला. संघर्ष, धडाडी आणि लोकाभिमुख कार्याचा हा दिमाखदार सोहळा बघून उपस्थितांची मने कृतज्ञ झालीत. जीवनातील अनंत संकटाशी झुंजणारी ही ऊर्जा आणि प्रेरणा शेकडोंच्या मनात कायम राहणार आहे.
लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी व स्व. ज्योत्सना दर्डा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन या सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या धर्मपत्नी मृदुला वालस्कर, डॉ.पद्मीनी तुरकर, महिला पोलीस उप निरीक्षक राधिका कोकाटे, मृणाल कोचिंग क्लासेसचे संचालक विमल असाटी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा, जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, कपिल केकत, नरेश रहिले, देवा शहारे, जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू, लघू जाहिरात प्रतिनिधी आशिक महिलावार, भावना कदम, सुवर्णा हुबेकर उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील आठ कर्तृत्ववान महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमत सखी अवॉर्ड प्रदान करून सन्मान करण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समुहाने सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. यामुळे विविध क्षेत्रातील व्यक्तींना कर्तृत्त्व गाजविण्याची संधी मिळाली. हा सोहळा महिला शक्तीचा गौरव असून लोकमतने या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी व्यक्त केले. महिलांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रात ठसा उमटविला आहे.
लोकमतने त्यांच्या कार्याचा सन्मान करुन इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचे मृणाल कोचिंग क्लासेसच्या संचालक विमल असाटी यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी लोकमतच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. शालू कृपाले, हिमेश्वरी कावळे, स्वाती वालदे, श्रृती केकत, शिवाणी जयस्वाल, वैशाली पुरोहीत, श्वेता घोष, उमाकांत रार्घोते, ललीता रार्घोते, श्रद्धा ठाकरे, देवयानी लांजेवार, नलीनी परशुरामकर, लक्ष्मी वाघाडे, शिरुला टेंभरे ग्रूप, दीपमल्लू यादव, वैशाली निर्वाण आदी उपस्थित होते. प्रणाली फाये यांनी लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्सना दर्डा यांची रेखाटलेली रांगोळी विशेष लक्षवेधक ठरली. यावेळी वर्षा भांडारकर यांना लोकमतच्यावतीने विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रास्तविक मांडून संचालन रामभरुस चक्रवर्ती यांनी केले. आभार जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संतोष बिलोणे, ऋषभ गडपायले व सखी मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले.
नृत्याने भरला रंग
महिलाशक्तीच्या कार्याचा गौरव करतानाच या दरम्यान आयोजित सखींच्या बहारदार नृत्यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. शालू कृपाले यांनी सादर केलेल्या लावणीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. या दरम्यान समुह आणि एकल नृत्य सखींनी सादर केले. परीक्षक म्हणून अविनाश गोंधुळे व राहुल बघेले उपस्थित होते.
वैशाली कोहपरे : शैक्षणिक
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून आहेत. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. याशिवाय महिला व युवतींसाठी विविध उपक्रम सुरू करुन विकासाची संधी मिळवून दिली. जि.प. हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्याचा ठसा उमटविला आहे़
संगीता व्यास : उद्योग व व्यवसाय
उद्योग व व्यवसाय क्षेत्रात धडाडीने कार्य करीत आहेत. सौंदर्य क्षेत्रामध्ये स्वबळावर व्यवसाय वाढविला़ महिलांनी उद्योगाच्या क्षेत्रात यावे, यासाठी सतत प्रोत्साहन देत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात, ही मांडणी सातत्याने करीत आहेत़
वर्षा गंगणे : कला व साहित्य
गोंदियाचे कला व साहित्यवैभव संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. महिला सक्षमीकरण या सारख्या विषयांवर शेकडो लेख प्रसिद्ध करून ओळख निर्माण केली. याशिवाय त्यांनी विविध साहित्य, कविता संग्रह लिहिले असून अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत़
मुक्ता हत्तीमारे : सामाजिक
संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उपदेशानुसार कीर्तनाच्या माध्यमातून अस्पृश्यता, दारूबंदी, हुंडाबळी, गौहत्या बंदी, व्यसनमुक्ती, जलस्वराज, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, बालविवाह बंदी, तंटामुक्त, निर्मल गाव, वृक्ष लागवड व शौचालयाचा वापर यावर जनजागृती केली व करतात.
माया राघोर्ते : क्रीडा
खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये प्राविण्य. खो-खो मध्ये नागपूर विद्यापीठ स्पर्धेत लागोपाठ तीन वर्षे विजेता. राष्टÑीय व जागतिक पातळीवरही महिला खेळाडू म्हणून गाजल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात महिलांनी अग्रेसर राहून देशाचे व स्वत:चे नावलौकिक करण्यातही पुढे यावे.
शिप्रा तिराले : वैद्यकीय
नक्षलवादी व आदिवासी क्षेत्रात काम. रूग्णवाहिका उपलब्ध नसताना स्वत:च्या पैशाने वाहन बोलावून रूग्णांना पुढील उपचारासाठी हलविले. अनेक शिबिरात रूग्णांची मोफत तपासणी व शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. फ्लोरेंस नाईट इंजेल कार्यक्रम तालुका स्तरावर राबविला.
राधिका कोकाटे : शौर्य
गडचिरोली परिक्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बदली करून घेतली. चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड, अत्याचार यासारख्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणले. दारूची प्रकरणे, नाकाबंदी, बंदोबस्त, रात्रगस्त व महिला तक्रार निवारणाचे कार्य केले.
एकल व समूह नृत्य स्पर्धेतील विजयाचे मानकरी
एकल नृत्य स्पर्धेत श्रृती केकत यांनी प्रथम क्रमांक, हिमेश्वरी कावळे यांनी द्वितीय तर श्वेता घोष यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत उमा महाजन समूह यांनी प्रथम, देवयानी अ‍ॅण्ड ग्रूप यांनी द्वितीय तर ओल्ड इज गोल्ड ग्रूपने तृतीय क्रमांक पटकाविला.

Web Title: Hats off to women's credentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.