चक्रीवादळाचा जिल्ह्यात कहर
By admin | Published: May 23, 2016 01:46 AM2016-05-23T01:46:51+5:302016-05-23T01:46:51+5:30
शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान आलेल्या चक्रीवादळाने जिल्ह्याभरातील अनेक गावांना चांगलेच झोडपून काढले.
कोट्यवधींची हानी : घरांवरील छतांसह वृक्षसुद्धा कोसळले, जनावरेही मृत
गोंदिया : शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान आलेल्या चक्रीवादळाने जिल्ह्याभरातील अनेक गावांना चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी वृक्ष रस्त्यावर पडून वाहतूक बंद पडली होती. काही ठिकाणी झाडे पडून विजेच्या तारा तुटल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता. या प्रकारामुळे बाधित गावांतील नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला.
गोरेगाव
तालुक्यातील पिपरटोला (निंबा) येथे चक्रीवादळाने अनेक जणांच्या घरावरील छत उडाले. विद्युत पोलही खाली कोसळले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर नागरिकांना अंधारातच रहावे लागले. पिपरटोला येथे वादळी वाऱ्यामुळे पळसाचा वृक्ष व कोसमचा वृक्ष पडले. हगरू रहांगडाले यांच्या घर व गोठ्यावरील टिनाचे पत्रे उडून रस्त्यावर पडले. त्यामुळे त्यांचे मोठेच नुकसान झाले असून आता त्यांच्या कुटुंबास कुठे रहावे? असा प्रश्न पडला आहे. गोठ्यावरील छत उडाल्याने गुरेढोरे कुठे बांधावे, अशीही बिकट समस्या त्यांच्यासमोर उद्भवली आहे. घरावरील छत उडाल्याने रहांगडाले कुटुंबाच्या घरातील सर्व सामान साहित्य पावसाच्या पाण्याचे ओले झाले. अनेक विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाला. पोलीस पाटील माधवराव शिवणकर, उपसरपंच पुरूषोत्तम कटरे यांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत घटनेची पाहणी केली आहे. तलाठी गोंडाणे यांना सदर प्रकार सांगूनही ते पाहणीसाठी उपस्थित झाले नाही. सदर शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काचेवानी
एप्रिलच्या शेवटी व मे महिन्यात तीनवेळा चक्रीवादळ, गार व पावसाच्या तडाख्याचा अनुभव नागरिकांना आला. तिसऱ्यांदा आलेला चक्रीवादळ अतिशय गतिमान असल्याने सर्वाधिक नुकसान झाले. हजारो झाडे पडली, घराचे छत उडाले, वीज तार तुटले व खांब खाली पडले. एवढेच नव्हे तर रेल्वेच्या रूळावर झाडे पडल्याने अर्धा तास एक्सप्रेस गाडी थांबवून ठेवावी लागली.
शनिवार (दि.२१) दुपारी ३ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने भयंकर रूप धारण केले. सर्वदूर असलेल्या या चक्रीवादळाचा काचेवानी परिसरातील बरबसपुरा, धामनेवाडा, एकोडी, मेंदिपूर, बेरडीपार, जमुनिया, काचेवानी, डब्बेटोला यासह अनेक गावांत व शेतशिवाराला फटका बसला. गावातील तसेच शिवारातील हजारो मोठे वृक्ष धराशाही झाले. घरावरील कवेलू व टिनाचे छत उडून शंभर मीटर दूरपर्यंत उडून गेले.
विद्युत तारांवर झाडे पडल्याने बरबसपुरा, काचेवानी, इंदोरा परिसरात तार व खांड तुटल्याने अंधारच अंधार पसरलेला होता. अर्धा तास आलेल्या या चक्रीवादळाने मोठाच नाश केला. शेतातील धानाचे कळपे उडून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले.
काचेवानी स्थानकावर सुपरफास्ट एक्सप्रेस ३५ मिनिटे थांबवानी लागली. धामनेवाडा व दांडेगाव येथे झाडे रेल्वेच्या रूळावर पडली. काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाडे हटविण्याचे काम पूर्ण केल्यानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या. रेल्वे रूळावरून झाडे हटविण्याच्या कामात काही नागरिकांनीही सहकार्य केले.
चक्रीवादळाने कोसळलेल्या झाडांमुळे तिरोडा-गोंदिया एसटी मार्गासह ग्रामीण भागातील रस्तेसुद्धा काही वेळ बाधित झाले होते. गावकऱ्यांनी व रस्ते ओलांडणाऱ्यांनी कसेबसे मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. जीवित हानी घडल्याचे वृत्त नाही. मात्र नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे.
सोनपुरी
सोनपुरी व परिसरात आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन अस्तव्यस्त झाले. अनेक ठिकाणी वीज पोल कोसळून आणि तार तुटल्याने वीज खंडित झाली आहे. रबी धानाला मोठा फटका बसला. आंबे चक्रीवादळाने खाली पडले आहेत. त्यामुळे मोठा नुकसान झाला आहे. सोनपुरीत भुरकी बसोने यांनी केलेल्या बांधकामाची भिंत पडून ३० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापलेले धानाचे करपे उडून मोठा नुकसान झाला आहे. तरी सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
सालेकसा
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूने धडक दिली असून त्याचा प्रभाव गोंदिया जिल्ह्यापर्यंत आल्याचे दिसून येत आहे. आज दुपारनंतर आलेल्या चक्रीवादळाने सालेकसा तालुक्याला जबरदस्त फटका बसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे टीन उडाले. जिजेच्या मुख्य तारा तुटल्या आहेत. याचा फटका बसला, परंतु मान्सूनपूर्व आलेल्या या पावसामुळे तालुक्यात उष्णतेचा त्रास कमी झाला असून तापमानात घसरण झालेली आहे आणि उकाळ्यापासून सुटका मिळाल्याचे दिसत आहे. वादळी वाऱ्याच्या धडाक्यात सालेकसा मुख्यालय परिसरातील गडमाता परिसर, बाबाटोली परिसरात, ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या. तसेच आमगाव-सालेकसा आणि सालेकसा-दरेकसा मार्गावरसुद्धा तार तुटल्याने वीज सेवा खंडित झालेली आहे. काही ठिकाणी मुख्य वाहिणीचे तार तुटल्याने त्यांची दुरुस्ती आज शक्य नसून तालुका मुख्यालयासह अनेक गावातील लोकांना विजेशिवाय रात्र काढावी लागेल. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे तुटून पडल्याने मार्ग अवरुद्ध झालेले आहेत. येत्या एकदोन दिवसांत आणखी वादळी वाऱ्याचा फटका लोकांना सहन करावा लागू शकतो, असेही बोलले जात आहे. पुन्हा पाऊस आला नाही तर उकाळा मात्र आणखी जास्त वाढू शकतो.
साखरीटोला
शनिवारला दुपारी अचानक आलेल्या वादळाने साखरीटोला येथील जनजीवन अस्तव्यस्त केले होते. वादळाचा कहर काहींना चांगलाच सोसावा लागला. प्रचंड हवेच्या वेगाने साखरीटोला तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची पडझड झाली. त्याबरोबरच बऱ्याच लोकांच्या घरावरील कवेलू, टिनाचे शेड तर सिमेंटची पत्रे उडून मोठे नुकसान झाले. जीवित हानी जरी झाली नसली तरी मात्र एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. येथील प्रेमलाल सयाम यांच्या घरावरील सिमेंटची पत्रे उडाली. काही पत्रे घरात पडली. यात त्याचा मुलगा गजानन सयाम घरात असल्याने त्याच्या अंगावर सिमेंटची पत्रे पडली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व सात टाके लागले. तसेच त्याच्या उजव्या हाताला मार लागला. नशीन बलवत्तर म्हणूनच तो वाचला. त्याच्या घराशेजारी असलेल्या रामकिशन अनंतराम तावाडे यांच्या घरावरची कवेलू उडाल्याने मोठे नुकसान झाले. तसेच गणेश तुलशीकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने कवेलूचे नुकसान झाले. बऱ्याच वर्षानंतर आलेल्या वादळाच्या प्रचंड वेगाने अनेकांची बाहेर ठेवलेली भांडीकुंडीसुद्धा उडाली. मुख्य मार्गावरील अनेक झाडे कोसळली. परिसरात सलंगटोला, कवडी, पानगाव, हेटीटोला, कारुटोला, गांधीटोला या गावातसुद्धा वादळाचा कहर लोकांना सहन करावा लागला. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
परसवाडा
तिरोडा तालुक्यात व परिसरात अचानक दोन अडीच वाजता चक्रीवादळ आल्याने चांदोरी खुर्द, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, बघोली, बोरा, गोंडमोहाळी, सोनेगाव, मुरदाडा, महालगाव, काचेवानी, खमारी, अनेक गावांत चक्रीवादळाने कहर केला. छत पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला. गावात २६ घरांचे छतही उडाले. परसवाडा येथील विजय कोटांगले यांच्या घराचे छत टिनासह २०० मीटर अंतरावर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन भर रस्त्यावर अडकले. शनिवारपासून परसवाडा गावात जाणारा रस्ता बंद आहे. त्या घराची पाहणी करण्यासाठी तिरोडा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले आले. त्यांनी तलाठी बारसे यांना तात्काळ पंचनामा व बरोबर योग्यरित्या नुकसानी आकडे टाकण्याचे निर्देश दिले. एक लाखाच्यावर त्यांचे नुकसान झाले. सर्व परिवारातील कुटुंब उघड्यावर आले. निलकंठ भंडारी यांना इंदिरा आवास योजनेतून घरकूल मिळाले होते. त्यांच्या घराचे नुकसान झाले. त्यांच्यासह एकूण ३० नागरिकांचे पंधरा लाखांचे घराचे नुकसान झाले. शेतीच्या धान पिकाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. कापलेले धान चक्रीवादळाने उडून गेले. कुठे गेले पताच नाही. अर्जुनीत १० लाखांचे, खैरलांजीत ७ घरे तीन लाख, बघोली १० लाख, बिहिरीया १० लाख, गोंडमोहाळी ५ लाखांचे नुकसान झाले. मात्र प्राणहाणी झाली नाही. आमदार विजय रहांगडाले यांनी प्रतिनिधीला सांगितले की, आपण लवकरात संपूर्ण रितसर सर्वेक्षण करू. एकही वादळात सापडलेला नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, याची खात्री करुन मदत त्वरित दिले जाईल व हयगय करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कार्यवाही करण्यात येईल. सोबत उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, चतुर्भूज बिसेन, डॉ. योगेंद्र भगत, माजी जि.प. सदस्य महेंद्र बागळे, मुकेश भगत, उपसरपंच मनिराम हिंगे, सुभाष रहांगडाले, रमेश बागळे, तलाठी बारसे होते. मात्र तहसीलदार रविंद्र चव्हाण सुटीवर असून प्रभारी नायब तहसीलदार मासळ मुख्यालय सोडून गावी गेले. संपर्क केले असता प्रतिसाद दिला नाही. उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांना विचारले असता त्यांनीही प्रतिसादच दिला नाही.