पावसाचा कहर ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:48 PM2019-09-02T21:48:08+5:302019-09-02T21:48:30+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंतिम टप्यात असताना मात्र जिल्ह्यात पाऊस चांगलाच खूश दिसून येत असून पहाटे ३ वाजतापासून बरसलेल्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात कहर केला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीची कामेही आटोपली शिवाय प्रकल्पांनाही चांगले पाणी आले. यामुळेच जिल्ह्यातील पाण्याची समस्या सुटल्याचे दिसत होते. त्यात मात्र रविवारी (दि.१) रात्री व सोमवारी (दि.२) सकाळी बरसलेल्या पावसामुळे जिल्हा आणखीच पाणीदार झाला आहे. पहाटे ४३ वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्याला पार झोडपून काढले असून चांगलाच कहर केला आहे. तालुक्यातील खजरी, बोथली व म्हसवानी या गावात लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. शिवाय, गावात पाणी साचून असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने काही घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याबरोबर अन्न, धान्य व कपडयांची नासधूस झाली आहे. मातीच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. शेत शिवारात पाण्याचा तडाखा जास्त असल्याने शेतीची नासधूस झाली आहे. गेल्या १० वर्षांत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला नाही, असे म्हसवानी गावातील नागरिक सांगत आहेत.
घटनेची माहिती मिळताच डव्वा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परसुरामकर यांनी म्हसवानी, बोथली, खजरी, डव्वा व घोटी परिसरात भेट देऊन पाहणी केली व तहसीलदारांना माहिती दिली.
त्याचप्रकारे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही चांगला पाऊस बरसला असून केशोरी मंडळात ६५.२० मीमी पाऊस बरसला असल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणात दुपारी १२.३० वाजतापर्यंत ९९.८० टक्के पाणीसाठा झाल्याने सायंकाळ ते रात्रीपर्यंत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. यामुळे गाढवी नदीत पाण्याची पातळी वाढून सुरबंध, बोंडगाव, चीचोली, कऱ्हांडली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर (अ) व (ब), जरूघाटा, वडेगावबंध्या, सावरी, बोरी व खोळदा ही गावे प्रभावीत होऊ शकत असल्याने त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे.
तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
जिल्ह्यात रविवारी (दि.१) पावसाने दमदार हजेरी लावून झोेडपले असतानाच आता सोमवारी, मंगळवारी व बुधवारीही अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशात प्रकल्पांची दारे उघडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने मासेमार, डोंगा वाहतूक करणारे शिवाय भुजली विसर्जन करणाऱ्यांना नदीत उतरू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच नदीकनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कुरखेडा बस अडकली
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे केशोरीपासून ५ किमी. अंतरावर असलेल्या धोबी नाल्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने साकोली- कुरखेडा बस अडकली होती व तीन ते चार गावांचा संपर्क तुटला होता. पाण्यामुळे गावातील लोकांना बाजार करण्यासाठी केशोरी येथे जाता आले नाही. शिवाय या मार्गावरून गडचिरोली जिल्ह्याचा मार्ग ही बंद होता.