पर्यटकांविना हाजराफॉल परिसर पडला ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:13+5:30
पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात आले. त्यामुळे या युवकांचा रोजगार हिरावला व उपासमारीचे संकट ओढवले आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जिल्ह्यातील सर्वात मोठा आकर्षक व नयनरम्य धबधबा सध्या दुधाची धार ओलांडत असून परम रोमहर्षक वाटत आहे. परंतु पर्यटन स्थळ बंद असल्याने एकीकडे हौशी पर्यटकांना याचा आनंद लुटता येत नाही. तर दुसरीकडे हाजराफॉल परिसरात काम करणारे युवक-युवती बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या हाजराफॉल परिसरात नैसर्गिक धबधब्यासह मुलांसाठी एडवेंचर स्पोर्ट आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठीही मनोरंजनाची विविध साधने स्थापित करण्यात आली आहेत. तसेच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ आणि व्यंजनांची सुविधा आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना हाजराफॉलचा आनंद लुटण्यासह विविध प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंचा स्वादही चाखता येतो. पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात आले. त्यामुळे या युवकांचा रोजगार हिरावला व उपासमारीचे संकट ओढवले आहे.
सप्टेंबर महिन्यात हाजराफॉल धबधबा सर्वात जास्त आल्हाददायक स्वरुपात असून उंच पहाडावरुन पडणारे पाणी दूधासारखा स्वच्छ श्वेत दिसून येते. परंतु या विहंमग दृष्याचे साक्षीदार बनन्यासाठी येथे पर्यटक नसून सर्व ओसाड दिसून येत आहे. स्टॉलच्या झोपडया आपोआप ध्वस्त होऊ लागल्या आहेत. खेळांचे साहित्य किलबिल करणाऱ्या मुलांची प्रतीक्षा करीत आहेत. धबधब्यातून उडणारे रोमहर्षक पाण्याचे तुषार पर्यटकांना मऊ स्पर्श दिल्याविनाच हवेत विरघळत आहेत. मागील ७ महिन्यांपासून सर्व परिसरात शुकशुकाट आहे. या मधात पक्ष्यांचा आरव आणि प्राण्यांचा चित्कार अवश्य ऐकायला मिळतो. त्यावर धबधब्याचा मंजुळ तान ऐकणारा मनुष्य प्राणी मात्र नदारत दिसतो. मागील ६ वर्षांपासून वैभवात वाढ झालेला हाजराफॉल पूर्वपदावर केव्हा येईल याची वाट बघावी लागणार आहे.
आंबट शौकीनांचा जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न
शासनाने आतापर्यंत पर्यटन स्थळ सुरु करण्याचे आदेश दिले नाही. त्यामुळे हाजराफॉल सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. परंतु काही आंबट शौकीन युवक या परिसरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करतात. वरच्या भागाकडून किंवा बोगद्याकडून हाजराफॉल पहाडावर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु समितीचे काही युवक त्यांना सतत थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यात काही युवक वाद घालतात.
‘पर्यटन स्थळ उघडल्यास कोरोना संकट वाढेल. कारण की येथे येणारे पर्यटक बेलगाम राहून कसेही वागतात. जास्तीतजास्त लोक मित्रमंडळी, सहकुटुंब किंवा जोड्याने येतात. तसेच या स्थळात नेहमी गर्दी होते. अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची सारखी शक्यता आहे.
-अभिजीत इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सालेकसा