आदिवासी महिलांचा हाजराफॉल कॅफे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:15+5:30
संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉल येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या सुरक्षेसंबंधी सुध्दा दक्षता घेतली जाते. यासाठी हाजराफॉल परिसरात प्रवेशद्वारापासून तर धबधब्यापर्यंत विविध ठिकाणी गरजेनुसार युवक-युवतींची नियुक्ती करण्यात आली आहे. या अंतर्गत कोसमतर्रा ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास ५० युवक युवतींना रोजगार देण्याचे काम संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केले.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : परिसरातील आदिवासी महिलांना नियमित रोजगार मिळावा तसेच हाजराफॉलला येणाऱ्या हौशी पर्यटकांना आवडीचे व्यंजन उपलब्ध व्हावे, यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीने हाजराफॉल कॅफे सुरु केला आहे. याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळत आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉल येथे येणाºया पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या सुरक्षेसंबंधी सुध्दा दक्षता घेतली जाते. यासाठी हाजराफॉल परिसरात प्रवेशद्वारापासून तर धबधब्यापर्यंत विविध ठिकाणी गरजेनुसार युवक-युवतींची नियुक्ती करण्यात आली आहे. या अंतर्गत कोसमतर्रा ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास ५० युवक युवतींना रोजगार देण्याचे काम संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केले. त्यामुळे या परिसरातील लोकांच्या राहणीमानात सुध्दा बदल होताना दिसून येत आहे. हाजराफॉल धबधबा वर्षभर पर्यटकांना आकर्षित करीत असून या ठिकाणी सतत पर्यटकांची रेलचेल सुरु असते. सुटीच्या दिवशी तर हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे हजेरी लावतात. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यावसायीकांना हॉटेल सुरु करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र यामुळे येथे येणाºया पर्यटकांना खाण्यापिण्याच्या सोयीपासून वंचित राहावे लागत होते. अशात संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ही सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक आदिवासी महिलांच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतु यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत याठिकाणी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना विचार करीत व्यंजन उपलब्ध करुन देण्यात आले.स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करुन देऊन आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा निर्णय घेतला. सालेकसा तालुक्याचे वन परिक्षेत्राधिकारी अभिजीत ईलमकर यांच्या पुढाकाराने स्थानिक महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्यात आला. तसेच दूरवरुन येणाºया पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.
स्थानिक महिलांना दिले प्रशिक्षण
सालेकसा तालुक्यातील स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन हाजराफॉल कॅफे सुरु करण्यात आले. महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर येथील तुली इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुनील साखरकर यांना प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. साखरकर हे प्रसिध्द शेफ असून त्यांनी येथील आदिवसी महिलांना चार दिवसाचे प्रशिक्षण दिले. या दरम्यान त्यांनी येणाऱ्या पर्यटकांसोबत कशी वागणूक असावी, त्यांचे स्वागत कसे करावे यासोबतच विविध प्रकारचे स्वादिष्ट व्यंजन वेळेवर कसे तयार करावे याबद्दल सखोल प्रशिक्षण दिले.
हाजराफॉल कॅफेची पर्यटकांना भुरळ
दहा दिवसीय प्रशिक्षणा दरम्यान महिलांना स्वच्छता राखणे,दैनंदिनी नियमित ठेवणे, पैशांचा हिशोब ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान सुरुवातीला १० महिलांनी प्रशिक्षण घेऊन हाजराफॉल कॅफे सुरु केला. येथे येणाºया पर्यटकांच्या आवडी निवडीनुसार, मुलांचे आवडते खाद्य पदार्थ तयार करुन दिले जातात. त्यामुळे अल्पावधीत हाजराफॉल कॅफेला पर्यटकांची पसंती मिळत आहे.
स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करुन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हाजराफॉल कॅफे फायदेशिर ठरत आहे.
- अभिजीत ईलमकर,
वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा.
हाजराफॉलला स्वादिष्ट व्यंजन व इतर खाण्यापिण्याची सोय म्हणून हाजराफॉल कॅफे सुरु झाल्याने तहान भूक भागविण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे. महिलांनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
- योगराज तरोणे,
पर्यटक आमगाव.