'तो' निघाला मांजरीच्या शिकारीच्या शोधात पण अडकला वनविभागाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:00 PM2020-09-02T12:00:21+5:302020-09-02T12:00:47+5:30
घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत रामटेके यांच्या घरी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एक बिबट्या दबा धरुन बसतो. घरातील सर्व लोक साखर झोपेत असताना खाटेखाली बिबट बसलेला दिसताच सर्वांची झोपच उडून जाते. प्रसंगावधान राखून घरचे मंडळी घराबाहेर पडतात. बिबट मात्र घराच्या छपरीतील खाटेखाली बस्थान मांडून बसून राहतो. घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. पहाटे साडेतीन वाजता वनविभागाला माहिती दिली जाते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेला श्वास सोडला. हा सर्व घटनाक्रम आज (दि.२) पहाटेच्या सुमारास घडला.
बोंडगावदेवीपासून ३ कि.मी. अंतरावर स्थानिक क्षेत्र सहाय्यक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत रामटेके यांच्या घरात मांजरीचा पाठलाग करताना बिबट्याने चक्क घरात प्रवेश केल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. गावाशेजारी जंगल व्याप्त परिसर आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. आपली शिकार शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला खांबी गावाशेजारील घराजवळ मांजर दिसली. मांजरीचा पाठलाग करताना तो बिबट यशवंत रामटेके यांच्या घरातच शिरला.
समोरचा दरवाजा उघडा ठेवून रामटेके परिवार झोपी गेले होेते. घरात मांजराची शिकार करताना बिबट्याची हालचाल घरातील लोकांच्या लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता घरातील तिघेही जण घराबाहेर पडले. बाहेरुन दरवाज्याची कडी लावल्याने बिबट घरामध्ये जेरबंद झाला. घरातील बिबट्याचा थराराचा प्रसंग रामटेके यांनी गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना सांगितला. सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटील ठाकराम मेश्राम यांनी वनविभाग,पोलीस स्टेशन यांंना पहाटे तीन वाजता माहिती दिली. माहिती मिळताच संबंधित अधिकारी खांबी येथे घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत बघ्यांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. बिबट घरातील खाटेखाली दबा मारुन बस्तान मांडला होता. रेस्क्यू टिम गोंदियाने कमान हातात घेतली. घरातील सर्व परिसरात जाळे टाकण्यात आले. बाहेरील दरवाजा समोर पिंजरा लावण्यात आला. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरवाज्या शेजारी बस्तान मांडून असलेल्या बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला सकाळी ७.४५ वाजता यश आले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.यानंतर बिबट्याला नवेगावबांधला हलविण्यात आले.