३० वर्षांनंतर पाणी पोहचणार ‘हेड टू टेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:50 AM2018-02-07T00:50:31+5:302018-02-07T00:50:57+5:30
शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प व तलावांव्दारे सिंचनाची सोय करुन दिली जाते. शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मागील तीस चाळीस वर्षांपासून कालव्यांची दुरूस्ती न केल्याने हे कालवे केवळ नाममात्र ठरत होते.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प व तलावांव्दारे सिंचनाची सोय करुन दिली जाते. शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मागील तीस चाळीस वर्षांपासून कालव्यांची दुरूस्ती न केल्याने हे कालवे केवळ नाममात्र ठरत होते. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. मात्र आता या कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती केल्याने हेड टू टेल पर्यंतच्या शेतापर्यंत प्रथमच पाणी पोहचणार आहे.
बाघ प्रकल्पातंर्गत ३५० कि.मी.अंतराच्या कालव्यांच्या माध्यमातून तीन तालुक्यातील १६३ गावातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत या कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र कालवे तयार केल्यानंतर या विभागाने त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी बरेच कालवे बुजले तर काही कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी उगवली आहेत. तर काही कालव्यांचे लोखंडी गेट चोरीला गेले आहेत. त्यामुळे या कालव्यांमधून पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते. शेतकऱ्यांसाठी हे कालवे केवळ नाममात्र ठरत होते. शासनाकडून दरवर्षी या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी तीन ते चार कोटी रुपयांचा निधी दिला जात होता. तो निधी नेमका कुठे खर्च केला जात असेल असा प्रश्न या कालव्यांची स्थिती पाहिल्यानंतर निर्माण होतो. बाघ प्रकल्पातंर्गत येणाऱ्या कालव्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली. तसेच हे कालवे दुरूस्त केल्याने नेमका काय बदल घडणार आहे. याची प्रत्यक्ष पाहणी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.४) करण्यात आली. त्यांच्यासोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छप्परघरे, उपविभागीय अभियंता टी. बी. कापसे, शाखा अभियंता व्ही. व्ही. निकम, जी. सी. तुरकर, एम. के. घुमडे, यांत्रिक विभागाचे एस. एच. गडेवार, पी. चकोले, एम.एन. शेख, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, काँग्रेस कमिटीचे महासचिव अपूर्व अग्रवाल व पत्रकार उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान आ. अग्रवाल यांनी केवळ कालव्यांची दुरूस्ती आणि खोलीकरणामुळे ३० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होणार असल्याचे सांगितले. शिवाय एका पाण्यामुळे शेतकऱ्यांना पिके गमविण्याची वेळ येणार नाही. या दरम्यान गोंदिया तालुक्यातील तेढवा-शिवणी उपसा सिंचन योजनेला सुध्दा भेट दिली. या योजनेमुळे या भागातील सिंचनाची समस्या कशी दूर होईल व शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे शक्य होणार असल्याचे सांगितले.
पिकांचा पॅटर्न बदलणार
सध्या या भागात केवळ धानाचे पिक घेतले जाते. मात्र रजेगाव-काटी, तेढवा-शिवणी आणि नवेगाव-देवरी या तीन उपसा सिंचन योजनमुळे शेतकºयांना तिन टप्प्यात पिके घेता येणार आहे. पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यानंतर या भागात उसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होणार असल्याचे आ. अग्रवाल यांनी सांगितले.
यंत्रणावरील धूळ झटकली
विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पोकलॅन्ड, जेसीबी, डोजर अशी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. मात्र ही सर्व यंत्रणा या विभागाच्या दुर्लक्षीत मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून होती. कित्येक यंत्रे खराब झाली. आ. अग्रवाल यांनी या यंत्रणावरील धूळ झटकायला लावून ती कालवे दुरूस्तीच्या कामात उपयोगात आणली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सुध्दा बचत झाली. सध्या याच यंत्रांच्या माध्यमातून कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू आह
१३३ कोटी रुपयांच्या निधीची गरज
बाघ प्रकल्पातंर्गत येणाºया १२२४ कालव्यांच्या दुरूस्ती आणि बांधकाम व १५ कि.मी.च्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी १३३ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास तीन तालुक्यातील सिंचनाची समस्या पूर्णपणे मार्गी लागण्यास मदत होईल.
जून २०१८ ची डेडलाईन
बाघ प्रकल्पातंर्गत येणाऱ्या ३५० कि.मी.च्या कालव्यांची दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आ.अग्रवाल यांनी जलसंपदा विभागाला जून २०१८ पर्यंतची डेडलाईन दिली आहे. या कालावधीत हे काम पूर्ण झाल्यास पुढील खरीप हंगामात ते शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे.