'त्या' मुख्याध्यापकाची तुरुंगात रवानगी, विद्यार्थिनीशी केले होते अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:57 PM2023-11-10T12:57:29+5:302023-11-10T13:00:02+5:30
कोकणा आश्रमशाळेतील प्रकार
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर अखेर गुन्हा दाखल करून तपासानंतर त्याला अटक करून भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. केदार मार्तंड गहाणे (४७) रा. कोल्हारगाव असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा जमी येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रमशाळेमध्ये आश्रमशाळेत १० व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांनी अश्लील चाळे केले आहेत. एकंदरीत ही घटना संपूर्ण शिक्षण विभागाला काळीमा फासणारी आहे. काही दिवसापूर्वी आश्रमशाळेच्या एका विद्यार्थिनीबरोबर त्यांचे एक छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत झाला होते. त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना निलंबित देखील केले होते. तर तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते. या संघटनेच्या मदतीने अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे यांच्या विरोधात ३५४ अ, ३५४ डी, ५०६ तसेच पोस्को कलम १०,१२, आणि अनुसूचित जाती जमाती कायदा (ॲट्रॉसिटी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर हे करीत आहेत.
विद्यार्थिनीने केली तक्रार
पीडित मुलगी ही श्रीकृष्णआदिवासी आश्रमशाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी येथे शिकत आहे. तक्रारदार विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, आरोपी मला ऑफिसमध्ये बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बहाण्याने पायाला पाय लावून वाईट उद्देशाने स्पर्श करत होते. त्यांनी नियमित हा क्रम सुरू ठेवला होता. तक्रारीवरून डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे विविध कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली.
मुख्याध्यापकला बडतर्फ करण्याचे दिले पत्र
मुख्याध्यापकासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याने या मुख्याध्यापकाला सेवेतून बडतर्फ करण्याचे पत्र संस्थेला दिले असल्याचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.