अन सरपंचानेच घेतले हातात कुदळ-फावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:47 PM2019-07-10T21:47:13+5:302019-07-10T21:48:42+5:30
तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. मात्र याची दखल संबंधित विभागाने न घेतल्याने अखेर विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेत स्वत: सरपंचाने हातात कुदळ फावडा घेत व श्रमदानातून रस्त्यावरील चिखल साफ करुन विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करुन दिला.
तालुक्यातील पुरगाव येथील सरपंच अनंतकुमार ठाकरे यांनी श्रमदान करुन चिखलाने माखलेल्या रस्त्याची डागडुजी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास कमी झाला.
पुरगाव २१०० लोकवस्तीचे गाव, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव अशी गावाची ओळख या गावचे सरपंच अननंतकुमार ठाकरे यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पुरगावची वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यांच्या गावविकासाची तळमळ अनेकांना भुरळ घालणारी आहे.
पुरगाव-सुखाटोला रस्त्याची दयनीय अवस्था त्यांनी प्रथम पाहिली. मजुरांना डागडुजी करण्याचे आदेश दिले. पण शेतीच्या कामामुळे मजूर काही सापडेना, शेवटी ग्रामपंचायत परिचर व सहकाºयांना घेऊन त्यांनी रस्त्याची डागडुजी केली. त्यांच्या कार्याचे गावकºयांनी सुध्दा कौतुक केले आहे.