सालेकसा तालुक्याची आरोग्य सेवा ऑक्सीजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:18+5:30
रुग्णालयात केव्हाही अपघाताचे रुग्ण भर्ती केले जातात. तसेच सामान्य रुग्ण त्यांनाही गरज पडल्यास भर्ती केले जाते. त्याचबरोबर प्रसूतीचे रुग्ण व इतर रुग्ण नेहमी या रुग्णालयात आपला औषधोपचार घेत असतात. परंतु या सर्वांसाठी एवढा मोठ्या रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर नियुक्त असून त्या एका डॉक्टराच्या भरवशावर संपूर्ण तालुक्यातील लोकांचा औषधोपचार अवलंबून राहिला आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाची दहशत पसरली असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच काही रुग्णांनी आपले प्राण ही गमावले आहे. अशात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी वाढत चालली आहे. परंतु सालेकसा तालुक्याची आरोग्य सेवा यावेळी सुद्धा ऑक्सीजनवर आलेली दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात कधीही मोठे आरोग्य संकट निर्माण होऊन संसर्गाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सालेकसा तालुक्यात एकूण ९२ छोटे-मोठे गावांचा समावेश असून या गावाची आरोग्य सेवा सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. या ग्रामीण रुग्णालयात नियमित दीडशे ते दोनशेच्या संख्येत बाह्यरुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी येत असतात. या शिवाय या रुग्णालयात केव्हाही अपघाताचे रुग्ण भर्ती केले जातात. तसेच सामान्य रुग्ण त्यांनाही गरज पडल्यास भर्ती केले जाते. त्याचबरोबर प्रसूतीचे रुग्ण व इतर रुग्ण नेहमी या रुग्णालयात आपला औषधोपचार घेत असतात. परंतु या सर्वांसाठी एवढा मोठ्या रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर नियुक्त असून त्या एका डॉक्टराच्या भरवशावर संपूर्ण तालुक्यातील लोकांचा औषधोपचार अवलंबून राहिला आहे.या वेळी येथील रुग्णसेवा व्हेंटीलेटरवर आलेली दिसत आहे. मात्र आरोग्य विभाग सालेकसा तालुक्याकडे कानाडोळा करीत आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.पी.एस.रामटेके यांना रुग्णालयाची संपूर्ण जवाबदारी पार पाडताना एकट्याला दिवसरात्र रुग्ण सेवा द्यावी लागत आहे. अशात त्यांनी आपले घरदार कुटूंब बाजूला ठेवून रुग्णालयातच वास्तव्य करीत २४ तास आरोग्य सेवा प्रदान करण्याची वेळ आली आहे. दररोज नियमित शेकडो रुग्णांची तपासणी व औषधोपचार करीत असतानाच दरम्यान तालुक्यात दररोज कुठे न कुठे अपघात होत असून त्या अपघाताच्या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात आणावे लागते. अशात डॉ. रामटेके यांना बाह्य रुग्ण तपासणी थांबवून अपघाताच्या रुग्णाकडे आधी लक्ष द्यावे लागते. एखादी प्रसूतीची महिला रुग्णालयात आली की परत तिच्यावर उपचार करण्यासाठी जावे लागते.
आपातकालीन सेवा ही द्यावी लागते
सालेकसा तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर असून या रुग्णालयात तालुक्यातील रुग्णासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्ण सुद्धा आपातकालीन औषधोपचार घेण्यासाठी केव्हाही पोहोचतात. अशात त्यांचा औषधोपचार डॉक्टर या नात्याने करावेच लागते. या व्यतिरिक्त एखाद्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची असेल तर याच डॉक्टरला धावून जावे लागत असते.
कोरोना संसर्गाचे संकट वाढले
ग्रामीण रुग्णालयात दररोज जवळपास ४०० लोकांचा औषधोपचार करावा लागत असून येथे मोठ्या गर्दीत रुग्ण लाईन लावून किंवा एकमेकांच्या सोबत शेकडो लोकांच्या संर्पकात येत आहेत. अशात एखादा कोरोनाग्रसीत रुग्ण आला तर शेकडो लोकांना कोरोनाचा संसर्ग होवून मोठा संकट निर्माण होऊ शकते.
कोरोनाच्या उपचाराची सोय नाही
संपूर्ण तालुक्याची भिस्त येथील ग्रामीण रुग्णालयावर असून एवढ्यात कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळल्यास त्याच्यावर औषधोपचार करण्याची कोणतीच सोय नाही. एकही लस सुद्धा येथे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. फक्त संशयितासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु तिथे सोय कोणतीच नाही. एवढ्यात संशयीत रुग्ण मिळाल्यास जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागेल.
ग्रामीण रुग्णालयात एकूण चार डॉक्टरांचे पद मंजूर असून सध्या मला एकट्यालाच पूर्ण जवाबदारी सांभाळावी लागत आहे. संकटाच्यावेळी किमान एक डॉक्टरची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्याची गरज आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-डॉ.पी.एस.रामटेके,
ग्रामीण रुग्णालय सालेकसा