आरोग्य केंद्रातील चाचण्या बंद; संशयित रुग्णांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:43+5:302021-04-28T04:31:43+5:30
सालेकसा : तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आयुर्वेदिक दवाखाने आणि काही उपकेंद्रामंध्ये घेण्यात येणारी कोरोना चाचणीचे काम बंद पडल्याने ...
सालेकसा : तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आयुर्वेदिक दवाखाने आणि काही उपकेंद्रामंध्ये घेण्यात येणारी कोरोना चाचणीचे काम बंद पडल्याने संपूर्ण तालुक्यात संशयित रुग्ण भटकत असून काही रुग्ण मोकाट फिरत आहेत. त्यामुळे तालुक्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागाने त्वरित लक्ष दिले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सालेकसा तालुक्यात कावराबांध, सातगाव, दरेकसा आणि बिजेपार या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून कावराबांध अंतर्गत सोनपुरी, सातगाव अंतर्गत गांधीटोला आणि दरेकसा अंतर्गत पिपरिया या गावामध्ये आयुर्वेदिक दवाखाने आहेत. आरोग्य विभागाने वरील चारही प्राथमिक आरोग्य केंद्र आयुर्वेदिक दवाखाने आणि एकूण २२ पैकी काही प्रमुख उपकेंद्रांवर सुद्धा कोविड चाचणीची सोय केली आहे; परंतु मागील दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात कोरोना चाचणी बंद आहे. त्यामुळे संशयित परिणामी कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दहा ते वीस टक्के संशयित मोकाट
तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या संक्रमण काळात सरासरी २०० संशयित रुग्णांची कोरोना चाचणी घेतली जात आहे. त्यापैकी १० ते २० टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. कावराबांध परिसरात याचे प्रमाण जास्त होते. अशात चाचणी किट संपल्याने कोणाचीच चाचणी केली जात नाही. त्यामुळे संशयित कोरोना रुग्ण बिनधास्त गावात फिरत आहेत.
एकाच केंद्रावर मोजक्या चाचण्या
एकीकडे संपूर्ण तालुक्यात किट उपलब्ध नसल्याने कोविड चाचण्या बंद झाल्या आहेत. अशात सालेकसा तालुक्याच्या ठिकाणी असलेले कोविड केअर सेंटरमध्ये दररोज ९० लोकांचीच चाचणी केली जाते. परिणामी, अनेकांना चाचणी न करताच परत जावे लागत आहे.
.....
सुरक्षा साहित्याचा तुटवडा
कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. दरम्यान आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साहित्य जसे पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धोका पत्करून काम करण्याची वेळ आली आहे.
......
‘कोविड टेस्ट किटचा स्टॉक संपल्यामुळे तालुक्यात दोन दिवसांपासून कोरोना चाचणी बंद आहे. चाचणी किटची मागणी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे केली आहे. किट उपलब्ध होताच पुन्हा चाचणी पूर्ववत सुरू करण्यात येईल.
-डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा.