आरोग्य विभागाने केली २.७८ लाख डोसेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:42+5:302021-04-05T04:25:42+5:30
गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याची गरज असल्याने लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आरोग्य विभागाने २,७८,८०० डोसेसची ...
गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याची गरज असल्याने लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आरोग्य विभागाने २,७८,८०० डोसेसची मागणी केली आहे. यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांना पत्र पाठविले आहे. एवढे डोस मिळाल्यास त्यांचे कसे वाटप करून लसीकरणाला गती देता येणार याचे संपूर्ण नियोजन आरोग्य विभागाने केले असून, त्याबाबत आरोग्य संचालकांना कळविले आहे.
कोरोना पु्न्हा कहर करीत असून, आता जिल्ह्यातील बाधितांची संख्याही ३०० पार झाली आहे. कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. यामुळेच आता शासनाकडूनही लसीकरणावर भर दिला जात असून, जास्तीत डोसेसचा पुरवठा जिल्ह्यांना केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातही लसीकरण जोमात सुरू असून, ८३ हजारवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र याला आणखी गती देण्याची गरज आहे. अशात आरोग्य विभागाने लसीकरणाला गती देत जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी २,७८,८०० डोसेसची मागणी केली आहे. यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांना पत्र पाठविले असून, या डोसेसचे कसे वाटप व नियोजन करण्यात आले आहे याचा संपूर्ण आराखडाच कळविला आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरण जोमात सुरू असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र आहे ते प्रमाण कमी असून, आजची स्थिती बघता लसीकरणाला आणखी गती देण्याची गरज आहे.
-----
..असे केले आहे नियोजन
आरोग्य विभागाने मागणी केलेल्या २,७८,८०० डोसेसचे नियोजन केले आहे. यामध्ये ११ ग्रामीण -उपजिल्हा रुग्णालयांसाठी ५२,८०० डोस, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ९६,००० डोस, ८० उपकेंद्रांसाठी ९६,००० डोस, तीन इतर शासकीय रुग्णालयांसाठी १८,००० डोस, तर सहा खासगी रुग्णालयांसाठी १६,००० डोसेसची मागणी करण्यात आली आहे.
-------------------------
अधिकरी-कर्मचारी व जनप्रतिनिधीही उतरले मैदानात
कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र कोरोना लसीला घेऊन आजही नागरिकांमध्ये संभ्रम असून, नागरिक लसीसाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. अशात नागरिकांमधील ही भीती दूर करून लसीकरणाप्रति जनजागृती करण्याची गरज आहे. यामुळेच आता आरोग्य विभाग अधिकारी-कर्मचारी व जनप्रतिनिधींची मदत घेत आहेत. यात जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व सरपंच-सदस्य आता मैदानात उतरले असून, गावागावांत भेट देऊन लसीकरणासाठी जनजागृती करीत आहेत.