उष्माघाताशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
By admin | Published: April 5, 2016 04:19 AM2016-04-05T04:19:26+5:302016-04-05T04:19:26+5:30
उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून
गोंदिया : उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेत येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेडची व्यवस्था असलेले हे कक्ष आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्थांनी सज्ज आहे.
उन्हाळ्यात उष्माघाताची समस्या नेहमीच गंभीर रूप धारण करते. उष्माघाताने जीव जाण्याचा धोका नसला तरिही वेळीच उपचार व आवश्यक ती काळजी न घेतल्यास उष्माघाताने जीवही जातो. हे प्रकार जिल्ह्यातही घडतात. जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात ४७ डिग्रीपर्यंत गेल्याचीही नोंद आहे. त्यामुळे उन्हाळा म्हटला की गोंदिया सर्वाधीक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत हमखास दरवर्षी दिसून येतो.
यंदाही आतापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. सूर्यदेव आता कोपू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हाची तिरीप बघताच घाम फुटू लागत असून वाढत्या उन्हामुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. वाढत्या तापमानाच्या या पाशातून मुक्तता शक्य नाही व येथेच येवून उष्माघाताची शक्यता बळावते. यामुळेच आरोग्य विभागाने वाढत्या उन्हाळ््याचे चित्र बघता उष्माघाताच्या या समस्येवर तोडगा म्हणून पाऊल उचलले आहेत.
येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. सहा बेड असलेल्या या कक्षात औषधी, कक्ष थंड ठेवण्यासाठी कुलर, डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास अतिदक्षता विभागही उपलब्ध करवून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
मागील वर्षी ४८ डिग्री
४जिल्ह्यातील तापमान उन्हाळ्यात ४७ डिग्रीपर्यंत जाते. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार १९ मे २०१५ रोजी गोंदियाचे तापमान ४८ डिग्री एवढे होते. यातून देशातील अतिउष्ण शहरांच्या यादीत गोंदियांची नोंदणी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे तापमान बघता आतापासूनच जास्तीत जास्त वृक्षारोपण व पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरूवात करणे हितावह ठरणार आहे.
डॉक्टर्सना दिले प्रशिक्षण
४उष्माघातावर काय करावे व काय नाही याबाबत रूग्णालयातील डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रूग्णालयात उष्माघाताचे रूग्ण आल्यास डॉक्टर्सही सज्ज असावे या दृष्टीकोणातून आरोग्य विभागाने हे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या या समस्येला घेऊन आरोग्य विभाग आतापासूनच चौकस असून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
उष्माघाताची लक्षणे व उपाय
४उष्माघात लक्षणे असलेल्या व्यक्तीला अस्वस्थपणाव थकवा जाणवतो. शरीर तापू लागते, अशक्तपणा व मळमळ येऊन अंग- डोकेदुखी होते. अशा वेळेस थंड जागेत व थंड वातावरणात रहावे, लहान मुले-मुली, वृद्ध व्यक्तीस गरोदर माता यांची विशेष काळजी घ्यावी, तहान लागलेली असो किंवा नाही भरपूर थंड पाणी प्यावे, सैल व फिकट रंगाचे कपडे घालवे, कापडाने डोके झाकावे, थंड पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी. तसेच भर दुपारी उन्हात काम करणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी.