आरोग्य सेवेचे धिंडवडे

By admin | Published: September 9, 2014 12:28 AM2014-09-09T00:28:21+5:302014-09-09T00:28:21+5:30

आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून

Health service card | आरोग्य सेवेचे धिंडवडे

आरोग्य सेवेचे धिंडवडे

Next

यशवंत मानकर - आमगाव
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून २०० रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ एका डॉक्टरवर आल्याने उपचार कुणाचा करावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तू अद्यावत आहेत. परंतु नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी सलाईनवर येऊन पडली आहे. तालुक्यातील ठाणा, कालीमाटी, अंजोरा, घाटटेमनी, तिगाव, बनगाव तसेच आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. परंतु सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात व आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.
तिगाव आरोग्य केंद्रावर नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांचे ‘आॅल इज वेल’ आहे. डॉक्टर व सुविधांच्या अभावामुळे रुग्ण उपचारासाठी दुसरीकडे वळत आहेत. प्रसुत मातांना तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णालय खटारा वाहनावर अवलंबून आहे. औषधांचा तुटवडा नेहमीचाच प्रश्न आहे. तालुक्यातील मुख्य केंद्र आमगाव येथे ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक सुविधा व स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष आहे. रुग्णालयात दररोज ३०० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी दाखल होतात. परंतु उपचार देणारे डॉक्टर व कर्मचारी पुरेसे नसल्याने रुग्णांची गैरसोय होते.
या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. हृषीकेश शंभरकर यांनी सदर विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच रिक्त पदांच्या मागणीकडे लक्ष वेधले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आरोग्यसेवा अद्यावत झाली नाही. येथे दैनंदिन सेवा देण्यासाठी डॉ. शंभरकर व सहकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ३०० रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागते. या कर्मचाऱ्यांचा वसाहतींची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. त्यामुळे कर्मचारी निवास व्यवस्थेपासून वंचित आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केंद्र व उपकेंद्र आरोग्य सेवा देत आहेत. परंतु योग्य उपचार व सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण परिसरातील रुग्ण आमगाव येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा घेण्यासाठी गर्दी करतात. रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणारे बनगाव प्राथमिक उपचार केंद्र रुग्णांना उपचार देण्यासाठी तत्पर असले तरी दैनंदिन २०० रुग्णांना उपचार देण्यासाठी असमर्थ ठरत आहे.
येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु यापैकी डॉ. अविनाश येळणे उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने विभागाने दुसऱ्या डॉक्टरची सोय उपलब्ध करुन दिली नाही. आरोग्य सेवकांची दोन पदे रिक्त आहेत. आरोग्य तपासणीत प्रयोगशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु तंत्रज्ञांची पदेही रिक्त असल्याने विविध तपासणी कंत्राटी पद्धतीवरील सहायक व्यक्तीवर अवलंबून आहे. येथे तांत्रिक सुविधांचा अभाव असूनही रुग्णसेवा सुरू आहे.
ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे . रुग्णांच्या कक्षात व परिसरात औषधांचा घनकचरा पडून आहे. गाद्या स्वच्छ नसल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या ३० खाटांच्या रुग्णालयात स्वच्छतेची नितांत गरज आहे.
तालुक्यात आरोग्यसेवा देणारी यंत्रणा स्वत:च्या विभागातील मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न पुढे आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते.

Web Title: Health service card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.