आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवकाचा मृत्यू

By admin | Published: June 15, 2015 12:50 AM2015-06-15T00:50:33+5:302015-06-15T00:50:33+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच ...

Health service death due to financial difficulties | आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवकाचा मृत्यू

आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवकाचा मृत्यू

Next

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आरोप : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतर करा
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून आर्थिक विवंचनेमुळेच आरोग्यसेवा घेऊ न शकल्याने तिडका येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक सुनील एन. येडेकर यांचा मृत्यू झाला, असा आरोप आरोग्यसेवकांनी केला आहे. तशी तक्रार व मागण्यांचे निवेदन सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली असून दैनंदिन गरजा भागविणेही दुरापास्त झाले आहे. तिडका येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेवक येडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चांगल्या उपचाराची गरज होती. परंतु पाच महिन्यांपासून पगार झाला नसल्याने पैशाअभावी ते चांगला उपचार घेऊ शकले नाही. उपचारादरम्यान त्यांचा १० जून रोजी मृत्यू झाला.
उल्लेखनीय म्हणजे, मार्च २०१५ मध्ये वेतनाचा प्रश्न घेऊन आरोग्य कर्मचारी खोडशिवनीची वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगळंगे यांना भेटले होते.
त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्च एन्डिंगचे काम संपल्यावर वेतन काढण्याचे आश्वासन दिले. मात्र मे महिना संपला असूनही एकाही महिन्याचे वेतन दिले नाही. कर्मचाऱ्यांचा असाही आरोप आहे की, वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत अपमानास्पद शब्द वापरून जाणीवपूर्वक त्रास देतात. येडेकर यांच्या मृत्युनंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगळंगे व डॉ. आत्राम यांना वाहनाची मागणी केली असता, त्यांनी शासकीय नियमावर बोट ठेवून वाहन देण्यास नकार दिला. मात्र, हेच शासकीय वाहन खासगी कामासाठी वापरल्या जाते. यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांप्रतीची अनास्था दिसून येते.
या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा संयम संपला असून येत्या २५ जूनपर्यंत दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतरत्र हलविण्यात यावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन तातडीने काढण्यात यावे अन्यथा २६ जूनपासून खोडशिवनी आरोग्य केंद्रासमोर साखळी उपोषणाला बसू, असा इशारा २४ आरोग्यसेवकांनी शासन व प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)

मार्च महिन्यापर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले आहेत. भानपूर व वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन बाकी होते, तेसुद्धा त्यांच्याच चुकीमुळे. आता सेवार्थ प्रणालीमुळे एकेक महिना वेतन होत नाही. याची प्रक्रिया एवढी किचकट आहे की ट्रेझरीमध्ये १०-१० दिवस बिल पडून असतात, पास होत नाही. पूर्वीची मॅन्युअली प्रक्रिया उत्तम होती, त्यात लवकरच वेतन होत होते. वेतन न झाल्यामुळे कुणाचाही मृत्यू होत नाही. एखाद्याला गंभीर आजार असेल तर उपचार घेण्यासाठी शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी सारख्या योजना आहेत. शासनाचे केटीएस व गंगाबाईसारखे रूग्णालये आहेत.
-डॉ. हरीश कळमकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.

Web Title: Health service death due to financial difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.