आरोग्य सेवा फिस्कटली
By admin | Published: July 1, 2014 11:31 PM2014-07-01T23:31:08+5:302014-07-01T23:31:08+5:30
मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची मुख्यमंत्र्यांनी पूर्तता न केल्याने राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याअंतर्गत त्यांनी जिल्हाधिकारी
डॉक्टर संपावर : सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल
गोंदिया : मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची मुख्यमंत्र्यांनी पूर्तता न केल्याने राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याअंतर्गत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) गट-अ व गट ब मधील अस्थायी असे १८२ वैद्यकीय अधिकारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ देणे, अस्थायी एमबीबीएस, बीएएमएस व बीडीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत स्थायी करणे, केंद्रशासन व इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चीत करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना उच्च वेतन योजना लागू करणे, केंद्रशासन व इतर राज्यांप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चीत करणे, आरोग्य विभागाचा पुर्नरचना आयोग स्थापन करणे तसेच व्यवसायरोेध भत्ता ऐच्छीक करणे या मागण्यांसाठी मागील कित्येक वर्षांपासून संघटनेचा लढा सुरू आहे.
या मागण्यांसाठी संघटनेने मध्यंतरी आंदोलन छेडले होते व तेव्हा मुख्यमंत्र्यांनी १० दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कालावधीत आश्वासनांची पूर्तता न केल्याने संघटनेने सोमवारपासून (दि.१) बेमुदत असहकार कामबंद आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंदू वंजारी यांच्याकडे सामुहिक राजीनामे दिले आहेत. तसेच हे आंदोलन पूर्णपणे असहकार आंदोलन असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायवैद्यक तपासणी, उत्तरीय तपासणी, बाह्यरूग्ण व आंतररूग्ण तपासणीसुद्धा बंद पाडली आहे.
या आंदोलनांमुळे जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने, अॅलोपॅथीच्या दवाखान्यांची व्यवस्था विस्कटली आहे. आंदोलन मंडपात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.वंजारी, सचिव डॉ.विनोद चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ.सी.आर.टेंभूर्णीकर, कोषाध्यक्ष डॉ. पंत्रू सडमाके, सल्लागार डॉ. राजेंद्र त्रिपाठी, डॉ.अमित खोडणकर, डॉ. अनिल परियाल, डॉ.घोरमारे, डॉ. मनोज राऊत, डॉ. अश्वीन जनईकर, डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्यासह अन्य वैदकीय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)