त्या पाच गावांची आरोग्य सेवा अद्यापही भगवान भरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:32+5:30
मुरकुडोह-दंडारीचे सर्व पाच गावे मिळून एकूण जवळपास एक हजार लोकांचे या गावांमध्ये वास्तव्य आहे.परंतु या एक हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य उपकेंद्राची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही.या गावातील लोकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना जवळपास २० किमीचा प्रवास करुन दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते.यासाठी त्यांना आपला पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याअभावी सुध्दा ते शक्य होत नाही.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील मुरकुडोह दंडारीच्या पाचही गावांमध्ये ना शासकीय ना खासगी स्वरुपाची कुठलीच आरोग्य सेवा उपलब्ध नाही. या भागातील लोकांना नेहमीच जीव मुठीत घेवून जीवन जगावे लागत असते.आरोग्य सेवेच्या बाबतीत शासनाने या गावांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पाचही गावांची आरोग्यविषयक सेवा भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे.
मुरकुडोह-दंडारीचे सर्व पाच गावे मिळून एकूण जवळपास एक हजार लोकांचे या गावांमध्ये वास्तव्य आहे.परंतु या एक हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य उपकेंद्राची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही.या गावातील लोकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना जवळपास २० किमीचा प्रवास करुन दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते.यासाठी त्यांना आपला पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याअभावी सुध्दा ते शक्य होत नाही. परिणामी त्यांना आपल्या पारंपरिक उपचारावर अवलंबून राहावे लागते. एखाद्या आजारावर तातडीने औषधोपचार मिळण्याची गरज पडल्यास ती सोय मिळाली नाही की कधी-कधी जीव गमविण्याची वेळ येथील गावकऱ्यांवर येते. या परिसरासाठी आरोग्याची सोय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा आहे. या पांचही गावांचा समावेश याच आरोग्य केंद्रात करण्यात आला. परंतु दरेकसा उपकेंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्रात संलग्नीत असल्यामुळे येथे स्वतंत्र इमारत व्यवस्था किंवा औषधोपचाराची व्यवस्था नाही. या उपकेंद्राच्या आरोग्य सेवा व आरोग्य सेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच आपली सेवा द्यावी लागत असते. दरेकसा उपकेंद्रा अंतर्गत मुरकुडोह-दंडारी या पाच गावां व्यतिरिक्त डहारटोला, डुंबरेटोला, कोपालगड, दल्लाटोला आणि चांदसूरज या इतर पाच गावांचा सुद्धा समावेश आहे. या उपकेंद्रात एकूण १० गावांचा समावेश आहे. परंतु या गावांसाठी फक्त एक आरोग्य सेवक आणि दोन आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना दहाही गावांना सतत आरोग्य सेवा देणे शक्य नाही. एवढ्यात मुरकुडोह दंडारीसारख्या २० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये जाणे तर मुळीच शक्य होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर कुणीच येथे पोहचू शकत नाही. त्यामुळे येथील लोकांना आरोग्याच्या बाबतीत भगवान भरोसे राहावे लागते. इतर दिवसात महिन्यातून किंवा दोन महिन्यात आरोग्य सेवक येथे भेट देतात. हा भाग जंगलव्याप्त असल्याने या परिसरात हिवतापाची लागण लोकांना लवकर होते. हे असे आजार आहेत की यावर ताबडतोब औषधोपचार मिळणे आवश्यक असते. परंतु दुर्गम भाग रस्त्यांचा अभाव व रुग्णांसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी गावठी इलाज करण्यावर लोकांचा विश्वास आहे. एखादया महिलेची प्रसूती करण्याची वेळ आली की अशावेळी गावातील दायी प्रसूतीची कामे करते. तर कधी कधी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागते.
मंजुरी मिळून ही उपकेंद्र सुरु नाही
मागील एक वर्षापुर्वीच मुरकुडोह-दंडारीसाठी महाराष्ट्र शासनाने एक उपकेंद्र सुरु करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार त्या गावांमध्ये कोणत्याही एका ठिकाणी प्राथमिक औषधोपचार आणि आरोग्य सेविका व आरोग्य सेवक नियुक्त करुन त्यांना त्या ठिकाणी नियमित सेवा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.