४९८ बालकांमध्ये आढळला हृदयरोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:03 AM2018-04-30T00:03:45+5:302018-04-30T00:03:45+5:30
बालमृत्यू व बालरोगांच्या प्रमाणात घट आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) सुरू राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (आरबीएसके) आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. कार्यक्रमांतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ४९८ बालकांमध्ये हृदय रोग आढळला आहे.
देवानंद शहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालमृत्यू व बालरोगांच्या प्रमाणात घट आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) सुरू राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (आरबीएसके) आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. कार्यक्रमांतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ४९८ बालकांमध्ये हृदय रोग आढळला आहे. या बालकांपैकी २९२ बालकांची हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. तर सन २०१७-१८ मध्ये ५९४ बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षाच्या बालकांची तपासणी संयुक्तरीत्या केली जात आहे. अंगणवाडी व शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील १८०१ अंगणवाड्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते व ते १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
एक लाख सात हजार ४९१ बालकांच्या आरोग्याची तपासणी करायची होती. यात ९९ हजार ८०५ (९३ टक्के) बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी पाच हजार २५९ बालकांच्या आरोग्यात साधारण गडबड आढळली. यावर त्याच ठिकाणी त्यांना औषधी देवून उपचार करण्यात आला. त्याचप्रकारे १४१० शाळांच्या तपासणीचे उद्दिष्टसुद्धा पूर्ण करण्यात आले आहे. यात दोन लाख तीन हजार २२८ बालकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यापैकी एक लाख ९६ हजार ८२८ (९७ टक्के) बालकांची तपासणी करण्यात आली आहे.
हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था आरोग्य विभागाकडे असली तरी कुटुंबीय कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे कुटुंबीय बालकांच्या हृदय किंवा इतर शस्त्रक्रियेसाठी लवकर तयार होत नाही. त्यासाठी बालकांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आरोग्य विभागाला खूप वेळ लागतो. अनेक पालक वेळेचा अभाव किंवा काही बहाणे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. हृदय रोग शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांपैकी काही बालके औषधींवर निर्भर आहेत.
५९४ बालकांवर झाल्या इतर शस्त्रक्रिया
राष्ट्रीय बालक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये आढळलेल्या शाळा व अंगणवाड्यांतील बालकांपैकी ६०४ बालकांची इतर शस्त्रक्रियांसाठी निवड करण्यात आली. यात हर्निया, हायड्रोसिल, थायमोसीस, तिरळेपणा आदींचा समावेश आहे. यापैकी ५९४ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून केवळ १० बालके उरली आहेत.
२९२ बालकांची हृदय शस्त्रक्रिया
आरबीएसके अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी सन २०१३ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत ४९८ बालकांमध्ये हृदयाचे रोग आढळले. यापैकी २९२ बालकांची हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे. यात सन २०१३-१४ मध्ये २, सन २०१४-१५ मध्ये १६, सन २०१५-१६ मध्ये १४३, सन २०१६-१७ मध्ये ६४ व सन २०१७-१८ मध्ये ६७ बालकांची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. केवळ १० प्रकरणे प्रलंबित आहेत. १७ बालकांना औषधी दिली जात आहे. १९ बालके हाय रिस्क आहेत. ३८ बालकांचे कुटुंबीय हृदय शस्त्रक्रियेसाठी तयार झाले नाहीत. ५० बालकांना फॉलोअपमध्ये ठेवण्यात आले आहे. १७ बालकांवर शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. ४ बालके एपीएल-बीपीएलचे आहेत. १० बालके जिल्ह्याबाहेर गेले आहेत. ६ बालकांच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाचा बजेट अतिरिक्त असल्यामुळे त्यांना विलंब होत आहे.