उष्माघाताचा कहर पक्ष्यांच्या जीवावर; गोंदिया जिल्ह्यात एकाच ठिकाणी १६ पक्षांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 11:50 AM2022-06-02T11:50:21+5:302022-06-02T12:24:59+5:30

वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे.

Heat Stroke triggers 16 Birds to Death In One Place at Gondia District | उष्माघाताचा कहर पक्ष्यांच्या जीवावर; गोंदिया जिल्ह्यात एकाच ठिकाणी १६ पक्षांचा मृत्यू

उष्माघाताचा कहर पक्ष्यांच्या जीवावर; गोंदिया जिल्ह्यात एकाच ठिकाणी १६ पक्षांचा मृत्यू

Next

 गोंदिया : वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना फक्त माणसांनाच याचा फटका बसत नसून पशुपक्ष्यांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. उष्माघाताने पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गोंदिया जिल्ह्यात वनविकास महामंडळाच्या जांभळी वनक्षेत्रात तब्बल १६ पक्षी मृतावस्थेत आढळून आले. हे सर्व पक्षी नैसर्गिक पाणवठ्याजवळ आढळल्याने उष्माघात की विषबाधा असाही संशय निर्माण झाला आहे.

सारस संवर्धनासाठी काम करणारी 'सेवा' या संस्थेची चमू प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करत असताना १२ ट्री पाई, एक शिकरा, एक युरेशियन स्पॅरो हॉक, एक व्हाइट थ्रोटेड किंगफिशर, एक सामान्य मैना हे पक्षी अर्धवट कोरड्या नैसर्गिक पणावठ्याजवळ मृतावस्थेत आढळले. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, ते कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या नमुन्याचा अभ्यास होऊ शकला नाही. प्राथमिक निरीक्षणात मृत्यूचे कारण विषबाधा किंवा उष्माघात असू शकते, असे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर म्हणाले.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे अनेक पाणवठे, जलस्त्रोत कोरडे पडले असून ग्रामीण भागात जनावरांना पाण्याच्या शोधात इकडून तिकडे भटकावे लागत आहे. प्राण्यांची भटकंती काही नवीन नाही मात्र, उन्हाच्या कोपामुळे मुक्या प्राण्यांचा जीव तडफडत आहे. जंगलातही जलस्त्रोत कोरडे पडल्याने जंगली पशु पाण्याच्या शोधात भरकटत गावाकडे येत आहेत. 

गोंदियाचा पारा ४४.८ अंशावर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून बुधवारी (दि.१) जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील पंधरा दिवसातील हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २५ मेपासून नवतपाला सुरुवात झाली असून आणखी दोन-तीन दिवस जिल्हावासीयांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यात दोन-तीन दिवसात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी सध्या वाढत्या उकाड्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण आहेत.

Web Title: Heat Stroke triggers 16 Birds to Death In One Place at Gondia District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.