भारी धानपीक मृत्यूशय्येवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:57 AM2016-10-19T02:57:34+5:302016-10-19T02:57:34+5:30
ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे.
शेतकरी चिंतातूर : ओवारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्याचा प्रताप
आमगाव : ओवारा प्रकल्प शेतकऱ्यांना जीवदान ठरणारा प्रकल्प म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील एक वर्षापासून कालव्यांना पडलेल्या भेगा बुजविण्यात न आल्याने भारीधान एका पाण्यासाठी मृत्यूश्येवर झुंज देत आहे. मात्र कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता क्रियाशील नाहीत. तक्रारी करुन निधी नाहीच्या नावावर केवळ लिपापोती केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केला आहे.
ओवारा प्रकल्पाचा एक कालवा वळद, सोनेखारी या परिसरातील जवळपास एक हजार एकर शेतीला सिंचन करतो. मात्र मागील दोनतीन वर्षापासून कालव्याला पडलेल्या भेगांमुळे शेतीपर्यंत पाणी जात नाही. याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या कालव्याला उन्हाळ्यात रबीकरिता पाणी दिला जातो. मात्र दुसरा असलेला कालवा त्याच सोनेखारी, वळद व परिसरातील गावांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीला सिंचन करण्यात अपयशी ठरला आहे. कालव्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यांना बुजविण्यात किंवा डागडुजी करुन शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता कार्यकारी अभियंता गेडाम व शाखा अभियंता धपाडे यांनी कोणतेच प्रयत्न चालविले नाही. उलट निधी नसल्याचे सांगून चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे भारी धान पाण्याअभावी मरणाच्या तयारीत आहेत. यात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली. या कालव्याला लागून कटंगटोला हे गाव असून येथील अपंग शेतकरी लाडकू ठाकरे यांची तीन एकर शेती पाण्याने मरत आहे. लाडकू ठाकरेला फक्त एक हात असून एकाच हाताने फुटलेली कालव्याची पाळ जीव धोक्यात घालून मुलासोबत तयार केली व शेतीपर्यंत पाणी नेण्याचे रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मात्र कालव्याला पाणी कमी येत असल्याने वळद, सोनेखारी, कटंगटोला या गावांना पाणी चढत नाही. अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र पूर्णपणे त्यांनी डोळेझाक केली आहे. हातात आलेले पीक पाण्याअभावी जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे व नोहरलाल चौधरी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)