गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी; नवेगावबांध, बेवारटोला ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:27 PM2020-08-29T13:27:43+5:302020-08-29T13:28:11+5:30
गोंदिया जिल्ह्यात मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गुरूवारपासूनच पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले भरुन वाहत आहेत. तर आमगाव-देवरी, ओवारीटोला-गोटाबोडी, पांढरवानी-कन्हाळगाव , रोपा-पालांदूर, परसोडी-आलेवाडा, मोहगाव-गडेगाव, शिलापूर-फुक्टीमेटा, अंभोरा-निलज हे मार्ग बंद झाले होते. सालेकसा तालुक्यातील दरेकसा-डहाराटोला व बंजारीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.
संततधार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे १२ आणि कालीसरार धरणाचे चार दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले होते. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशय आणि सालेकसा तालुक्यातील बेवारटोला शंभर टक्के भरल्याने ओव्हर फ्लो झाले होते. पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.