गोंदिया, तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:14+5:302021-07-10T04:21:14+5:30
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रोवण्या पूर्णपणे खोळंबल्या होत्या, तर धानाचे पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर होते. पाऊस ...
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रोवण्या पूर्णपणे खोळंबल्या होत्या, तर धानाचे पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर होते. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीच्या संकटाला तोंड देण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र, गुरुवारी (दि. ८) जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली. तर, रोवणीयोग्य पाऊस झाल्याने शुक्रवारपासून रोवणीच्या कामाला वेग आल्याचे चित्र होते. जिल्ह्यात मागील २४ तासांत गोंदिया तालुक्यात ६९ मिमी तर तिरोडा तालुक्यात ८०.८ मिमी पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी ५.७ मिमी पावसाची नोंद देवरी तालुुक्यात झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात रोवणीच्या कामाला वेग आला असून बळीराजा सुखावल्याचे चित्र होते.
............
तलाव, बोड्यांमध्ये अत्यल्प साठा
हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला. मात्र, सुरुवातीपासूनच तो अंदाज पावसाच्या अनियमिततेमुळे खाेटा ठरत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील तलाव, बोड्यांमध्ये अद्यापही अत्यल्प पाणीसाठा आहे.
.....................
तालुकानिहाय झालेला पाऊस
तालुका झालेला पाऊस मिमी
गोंदिया ६९.०
आमगाव ३९.२
तिरोडा ८०.८
गोरेगाव ३९.७
सालेकसा १६.५
देवरी ५.७
अर्जुनी मोरगाव १५.४
सडक अर्जुनी १८.७
...............................
एकूण ३७.८