चार तालुक्यात अतिवृष्टी, धानपीक झाले भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 10:25 PM2022-10-12T22:25:08+5:302022-10-12T22:25:42+5:30
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून गेल्या २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे धानपीक भुईसपाट झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. मंगळवारी (दि.११) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील उभे धानपीक जमीनदोस्त झाले. तर बांध्यामध्ये पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांना हाती आलेला पीक गमावण्याची वेळ आली आहे.
त्यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाचा अंदाज घेता शेतकऱ्यांनी पुढील चार-पाच दिवस हलक्या धानाची कापणी करून नये, असा सल्ला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या
परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात मागील २४ तासात आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकूण ५१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात ७५.५ मीमी, आमगाव ७१.८ मीमी, तिरोडा ९४.२ मीमी आणि गोरेगाव तालुक्यात ६५.१ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
हजारो हेक्टरमधील पिके झाली बाधित
- जिल्ह्यात यंदा १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली असून सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. तर जड धानाची कापणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद
पावसाळ्याचा कालावधी हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. पण यंदा सप्टेंबर महिना लोटूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मागील २४ तासात जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद प्रथमच झाली असून परतीचा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा बरसल्याचे जिल्ह्यातील वयोवृद्धांनी सांगितले. तर पावसाचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांना धान पिकांची चिंता सतावत आहे.