गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:02+5:30
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीही वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता या धरणाचे सहा दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पाऊस झाला असून, गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने पावसाची ३० ते ४० टक्के तूट निर्माण झाली होती. त्यामुळे पुढे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्यात पडलेली पावसाची तूट भरून निघाली असून, सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले, तलाव व सिंचन प्रकल्प भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहे. खरीप हंगामाची चिंतादेखील काही प्रमाणात कमी झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
धरण क्षेत्रातसुध्दा पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ७ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले.
सरासरीच्या १४१.१ टक्के पाऊस
- जिल्ह्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत ३९३.६ मिमी पाऊस पडतो. तर प्रत्यक्षात या कालावधीत आतापर्यंत ५५५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी १४१.१ टक्के आहे. तर मान्सून कालावधीत ४५.३ टक्के पाऊस झाला आहे.
त्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कालीसरार धरणाचेही दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या ९६ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.