दमदार पावसाने बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:54 AM2017-07-18T00:54:15+5:302017-07-18T00:54:15+5:30
आतापर्यंतची जिल्ह्यातील पावसाची सरासरी बघून सर्व तालुक्यांपेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याचे दिसून येते.
शेतात साचले पाणी : आमगावातही मुसळधार पाऊस, अतिवृष्टीपूर्व प्रशासन सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आतापर्यंतची जिल्ह्यातील पावसाची सरासरी बघून सर्व तालुक्यांपेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याचे दिसून येते. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतात रोवणीची कामे रखडली होती. परंतु सोमवारी १७ जुलै रोजी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. हंगामातील दमदार पावसाने अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
दुपारी १२.३० वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल दीड तासपर्यंत पडत राहीला. त्यामुळे गावातील रस्त्यांना नाल्याचे रूप आले होते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नसल्यामुळे किंवा बणलेल्या असून गाळ उपसण्यात आली नसल्याने घराच्या छतावरील पाणी पडून सरळ गल्ली रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे लोकांना त्रास झाल्याचेसुद्धा दिसून आले. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
आतापर्यंत पडलेला पाऊस शेतात संग्रहीत होण्यापुरता पडला नव्हता. त्यामुळे रोवणीची कामे सुरू झाली नव्हती. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत होते. एकदीड तास पाऊस पडूनही अजूनही या जमिनीवर पाणी योग्यरित्या न साचल्याने आणखी दमदार पावसाची वाट शेतकरी बघत आहेत.
काही शेतकऱ्यांच्या पऱ्हे टाकण्याला महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यामुळे नर्सरी रोवणीसाठी उपयुक्त झालेली आहे. परंतु यापुढे नर्सरीचा वेळेवर उपयोग झाला नाही तर त्या नर्सरीचा धान उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सामान्यत: १५ ते २० दिवसांच्या कालावधीची नर्सरी रोवणीसाठी सर्वोत्तम मानली जाते. २० ते २५ दिवसांची नर्सरी उत्पादनासाठी समाधानकारक असते. परंतु ३० दिवसांनंतरची नर्सरी रोवणीसाठी वापरल्यास धान उत्पादनावर परिणाम करणारी ठरते. त्यातच हलक्या जातीचे कमी कालावधीचे धानाचे वाण टाकल्यास त्या धानाची नर्सरी ३० दिवसांच्या नंतर लावल्यास उत्पादनावर मोठा फरक पडतो. ही बाब लक्षात घेता आता यापुढे जर पाऊस पुन्हा खंडीत झाला व रोवण्या खोळंबल्या तर धानपिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी आजच्या पावसाने शेतकरी सुखावला असून कामात गुंतला आहे.
आमगाव येथे मुसळधार पाऊस
आमगाव : शहरात विविध ठिकाणी मूसळधार पावसाने शेतकरी सुखावला, तरी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नागरी वस्तीत साचलेल्या पाण्याने नुकसान केले. तर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आमगाव शहर परिसरात मूसळधार पावसाने शेतकरी वर्गाला समाधान झाला. परंतु या पावसाच्या पाण्याने प्रशासनाची पोलखोल केली. मुख्य मार्गावरील व नागरिक वस्तीत सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटारांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाल्यांचा प्रवाह बंद पडला आहे. त्यामुळे सोमवार (दि.१७) दुपारी पडलेल्या पावसामुळे लोकवस्तीत नासाडी झाली.
या पावसामुळे शहरातील पोलीस स्टेशन परिसर, प्रभाक क्रमांक तीन, सहा व एकमधील नागरी वस्तीत पाणी साचले. नागरिकांच्या घरांमध्ये दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने घरातील साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले.
नगरात पडलेल्या पावसाने नगर प्रशासनाच्या कार्याची पोल खोल केली. नाल्यांचे अतिक्रमण, त्यात साचलेले केरकचऱ्याचे ढिग यामुळे नाल्या चोक झाल्या आहेत. नगर प्रशासनाचे अनेकदा या समस्यांकडे नागरिकांनी लक्ष वेधून नाल्यांची सफाई व नाल्यांवर पडलेले घर बांधकामाचे साहित्य हटविण्यासाठी मागणी केली होती. परंतु स्वच्छता कंत्राटदार व अतिक्रमण केलेल्या काही व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष केले.
या प्रकारामुळे अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे लोकवस्तीत पाणी साचून नुकसान झाले. मुख्य मार्गावरील नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने तर व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नाल्याची दुरवस्था उघड झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. याच मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांंमध्ये पाणी साचल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. त्यात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागली.
नागरिकांना त्रास झाला तरी शेतकऱ्यांना पहिल्या हंगामात आता जोरदार पाऊस पडल्याने त्यांना मोठाच आनंद झाला आहे.
अतिवृष्टीची शक्यता
येत्या काही दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून काही गावांना पुराचा फटका बसू शकतो. जी गावे पूरग्रस्त भागात नदीकाठी आहेत, त्या गावांतील लोकांनी सावध रहावे. प्रतिकूल हवामान असल्यास घराबाहेर नदी-नाल्याच्या तिरावर किंवा त्या परिसरात जावू नये. आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या विविध विभागांसह महसूल विभागाच्या संपर्कात रहावे.’’
प्रशांत सांगळे,
तहसीलदार सालेकसा.