दररोज फसतात रस्त्यावर जड वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:26+5:30
गोरेगाव नेहरु राईस मिलच्या पुढे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहे. पण या खड्यात साधे मुरुम टाकण्याचे सौजन्य ही कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची संथ गती का आहे,याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे संबंधित व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कंत्राटदारावर किती दबाव आहे, याची प्रचिती येते.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव-गोंदिया या राज्य मार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. पावसाळ्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून त्यात दररोज जड वाहन फसत असून दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मंगळवारी रात्री याच मार्गावर एका दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जखमी झाले. मात्र यानंतरही रस्त्याची दुरूस्ती करण्याचे सौजन्य कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात चांगले दर्जेदार रस्ते गरज बनत चालली आहे.ज्या रस्त्याच्या भरवशावर देशातील दळणवळण चालते. त्या रस्त्याविषयी संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याने वाहनचालकांची समस्या मात्र कायम आहे. गोरेगाव-गोंदिया महामार्गाची आताची स्थिती पाहण्यासारखी आहे. रस्त्यावर चिखल की चिखलात रस्ता यावर भाष्य करणे कठीणच आहे.एकीकडे चिखल तर दुसरीकडे धुळाने माखलेल्या रस्त्यावर वाहनचालकांनी प्रवास कसा करावा हा खरा प्रश्न आहे. गोरेगाव नेहरु राईस मिलच्या पुढे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहे. पण या खड्यात साधे मुरुम टाकण्याचे सौजन्य ही कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची संथ गती का आहे,याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे संबंधित व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कंत्राटदारावर किती दबाव आहे, याची प्रचिती येते.गोरेगाव-गोंदिया महामार्गावर दररोज एकतरी जड वाहन मातीत फसलेले दिसते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.अनेक वाहनांना क्रेनच्या साह्याने रस्त्यावर सुरळीत काढण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले तर अनेक वाहन चालकांना चौवीस तास फसलेल्या वाहनांची राखणदारीही करावी लागली. रस्ता बांधकाम करताना किंवा एखाद्या रस्त्याचे काम सुरु असतांना वाहन फसने फार मोठी घटना नाही, पण रस्ता बनविण्यासाठी असणारी कालमर्यादा महत्त्वाची ठरते. ढिम्म गतीने जर का एखाद्या रस्त्याचे काम सुरु असेल तर त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागतात. सर्वसामान्यानी प्रशासनाच्या किंवा कंत्राटदाराच्या दिरंगाईसाठी हालअपेष्टा सहन कराव्या का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वनवे रस्त्यामुळे होतात भांडणे
गोरेगाव-गोंदिया महामार्गावर चार ते पाच किमीचा तुटक सिमेंट कॉक्रेटचा रस्ता कंत्राटदाराने ये-जा करण्यासाठी खुला केला आहे. पण सदर रस्त्याची रुंदी चार मिटर असल्यामुळे दोन्ही बाजूने आलेल्या जड वाहनाला जागा उरत नाही. अशावेळी वाहन मागे कोण घेईल अशी समस्या निर्माण होते. यात अनेक लहान चारचाकी वाहनांना तासनतास रांगेत उभे राहून ताटकळत उभे रहावे लागते.
तीन आमदार व पालकमंत्र्यांचा रहदारीचा रस्ता
गोरेगाव-गोंदिया या महामार्गावर तीन आमदार व पालकमंत्री ये-जा करतात पण चारही लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ.परिणय फुके सुध्दा याच रस्त्याने ये-जा करतात मात्र त्यांचे सुध्दा याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते