रुग्णालयातच रुग्ण भोगताहेत नरक यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:32+5:30
जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. येथील चार वार्ड बंद करून सध्या एकाच वॉर्डातून काम सुरू असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजारी पडल्यानंतर रुग्णाला बरे होण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे उपचार करुन रुग्ण बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सध्या स्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले जाणारे रुग्ण बरे होवून परतण्याऐवजी त्यांना तेथील गैरसोयीमुळे नरक यातना भोगाव्या लागत आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी तो अधिक आजारी होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. येथील चार वार्ड बंद करून सध्या एकाच वॉर्डातून काम सुरू असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. परंतु हे वैद्यकीय महाविद्यालय आधीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या तुलनेत सेवा देण्यास मागे पडत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांना सेवा देण्यासाठी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील चार वार्ड खाली करण्यात आले. त्या वार्डात बेड, व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली. परंतु कोविड रूग्णांना या वैद्यकीय महाविद्यालयात ठेवले जात नाही. कोविड रूग्णांना जिल्हा क्रीडा संकुल, एम.एस.आयुर्वेदीक महाविद्यालय येथे ठेवले जाते. कोविड रूग्णांना ठेवलेही जात नाही आणि ते वॉर्ड सर्वसामान्य रूग्णांसाठी मोकळेही केले जात नाही. विविध आजाराचे रूग्ण, विष प्राशन केलेले, जळीत, अपघात झालेले, रक्ताक्षय किंवा कोणत्याही प्रकारचा आजार घेऊन आलेल्या रूग्णांना वार्ड क्रमांक पाच येथे एकाच वॉर्डात ठेवले जात आहे.
एका वार्डात जागा नसल्याने रूग्णांना खाली झोपविले जात आहे. पावसाळ्याचे दिवस व कोरोनाची साथ असतानाही या वैद्यकीय महाविद्यालत वॉर्ड क्रमांक पाचमध्ये पाहिजे तशी स्वच्छता नाही. जिल्ह्यातील गोरगरीबांना या वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिली जात नाही.
रुग्णालयातच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनावर मात करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. परंतु याच आरोग्य विभागात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडविला जात आहे. एकाच वार्डात मोठी गर्दी दररोज पाहायला दिसते. या वॉर्डात सुरक्षित अंतर दिसतच नाही.
शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीख
या एकाच वार्डातून व एकाच ओटीतून काम होत असल्यामुळे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीख दिली जाते.बड्या लोकांसोबत ओळख असलेल्या लोकांचे काम येथे वशीला लावून केले जाते.परंतु गोरगरीबांना फक्त तारीख पे तारीख मिळत असल्याने त्यांना वेदना सहन केल्याशिवाय पर्याय नाही. या प्रकराकडे लक्ष देण्याची गरज आहे.
धोका कोरोनाचा नाही जीवाचा
कोरोना विषाणूचा धोका मोठा आहे, असे आरोग्य विभाग म्हणते परंतु ज्या रूग्णांचा उपचार होत नाही त्यांना कोरोनाचा धोका कमी आणि असलेल्या आजाराचा धोका अधिक वाटतो. कोरोनाच्या नावावर डॉक्टरांचे वेळ मारू धोरण, त्यात काम न करता रुग्णांनाच धमकाविण्याचे काम येथे केले जाते. परंतु आपला उपचार करणार नाहीत या भीतीपोटी डॉक्टरांना काही म्हणायला रूग्णांचे नातेवाईक धजावत नाही.