वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:37 AM2018-10-13T00:37:35+5:302018-10-13T00:38:50+5:30
जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात येणार आहे.
अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिक संकट येते. दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबावर संकट कोसळते.
हीच बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती महिनाभरापूर्वीपासून करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे ९ पोलिसांना दंड करण्यात आला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केलेला नाही, अश्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी, यासंदर्भात १३ सप्टेंबरला विशेष मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत ९ पोलीस कर्मचारी वाहन चालविताना हेल्मेट वापरलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन काद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ४५०० रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात आला.
आता सर्वसामान्य वाहन चालकांना व त्या वाहनावर मागे बसलेल्या लोकांनाही हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावरही मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. दंड म्हणून ५०० रूपये आकारण्यात येणार आहे. वाहन चालकांना सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेट वापरावेच लागते. परंतु बहुतांश वाहन चालक हेल्मेटला सांभाळण्याची कटकट समजून हेल्मेट वापरत नाही. त्यांना आता मोटार वाहन कायद्यान्वये दंड भरावा लागणार आहे.
मोटारसायकल चालकांनी व मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेट वापरावेत. हेल्मेट न वापरणाºयांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
- संजय सिंह,
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.