हेल्मेटसक्ती, चार तासात साडेतीन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:57 AM2018-11-18T00:57:51+5:302018-11-18T00:59:12+5:30
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. याच अंतर्गत पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी (दि.१७) सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०१० वाहन चालकांकडून ३ लाख ४६ हजार ८०० रूपयांचा दंड करून वसूल केला.
जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायककल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्ती अवकाळी मृत्यू पावतात. वाहन चालक प्राणास मुकू नये, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे १५ पोलिसांना यापूर्वी दंड करण्यात आला होता. सामान्य नागरिक वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा म्हणून त्यांच्यासाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली.
पोलिसांनी शहर आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती करुन देखील याकडे वाहन चालक दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पोलीस विभागाने शनिवारी (दि.१७) रोजी आॅपरेशन आॅल आऊट अभियान राबविले. या अभियानात १०१० पैकी ४९० वाहन चालक हेल्मेट वापरलेले नसल्यामुळे त्यांना प्रत्येकी ५०० रूपये दंड करण्यात आला.
या कारवाईत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर सुध्दा कारवाई करण्यात आली. गोंदिया शहरात करण्यात आलेल्या कारवाईतून १ लाख ३५ हजार १०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट विक्रेत्यांची दिवाळी
पोलीस विभागाने हेल्मेट सक्तीसाठी शनिवारी (दि.१७) शहर आणि ग्रामीण भागात आॅपरेशन आॅल आऊट अभियान राबविले. या अभियाना दरम्यान शहर आणि शहराबाहेरील सर्वच मार्गावर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस शिपाई कारवाईसाठी सज्ज होते. त्यामुळे हेल्मेट खरेदीसाठी अनेक वाहन चालकांची शहरातील दुकानांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या हेल्मेट विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी उसळली होती. त्यामुळे पोलीस विभागाच्या या मोहीमेमुळे हेल्मेट विक्रेत्यांची दिवाळीनंतर दिवाळी झाल्याचे चित्र होते.
एकाच दिवशी आठ दहा लाखाच्या हेल्मेटची विक्री
शनिवारी शहरात आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी पूर्वीच दिली होती. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी आधीच हेल्मेट खरेदी केले. तर काहीनी शनिवारी सकाळीपासूनच हेल्मेट खरेदीसाठी लगबग सुरू होती. दरम्यान शनिवार शहर आणि ग्रामीण भागात आठ ते दहा लाख रुपयांच्या हेल्मेटची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.