शुभांगी रहेलेला दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:33+5:302021-07-11T04:20:33+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील हलबिटोला येथील रहिवासी शुभांगी सुनील रहेले हिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने तिच्यावर एकाकी जीवन जगण्याची वेळ ...
सडक अर्जुनी : तालुक्यातील हलबिटोला येथील रहिवासी शुभांगी सुनील रहेले हिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने तिच्यावर एकाकी जीवन जगण्याची वेळ आली होती. याची माहिती येथील जि.प.हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांना मिळताच, त्यांनी शुभांगी रहेले हिला भेटून मदतीचा हात द्यायचा संकल्प केला. सेवानिवृत्त सहायक फौजदार सुखदास मेश्राम, भगवान नंदागवळी यांना घेऊन शनिवारी (दि.१०) चिखली येथील शुभांगीचे घर गाठून तिला अन्नधान्य व रोख स्वरूपात मदत केली.
शुभांगीच्या आई-वडिलांचा मृत्यू २०१५ मध्ये झाला. आजोबांचे आधीच निधन झाले. शुभांगी आजीसोबत राहायची, पण नियतीने शुभांगीपासून आजीलाही २०१९ ला हिरावून नेले. तेव्हापासून शुभांगी एकटीच राहते. मेहनत करून आपला उदरनिर्वाह करून शिक्षण घेत आहे. मुख्याध्यापक अनिल मेश्राम, सेवानिवृत्त सहायक फौजदार सुखदास मेश्राम, भगवान नंदागवळी यांनी शुभांगीची भेट घेऊन तिची परिस्थिती जाणून घेतली. आपण अनाथ समजायचं नाही. आम्ही सगळे सोबत आहोत. काळजी करू नकोस. तिच्याशी हितगुज केले, तेव्हा शुभांगीचे डोळे भरून आले. शांत, निरागस शुभांगीला मानसिक बळ दिले. तिच्या उदरनिर्वाहाकरिता तांदूळ, डाळ, गहू, तेल, तिखट, जीवनावश्यक किराणा सामान, वह्या, पुस्तके, मास्क आणि नगदी दोन हजार रुपये दिले. या पुढे तिला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करू, असा आधार दिला. शिक्षण सोडू नकोस, आम्ही सगळे सोबत आहोत. शिकून मोठी हो, कधीच स्वतःला अनाथ समजायचे नाही. यावेळी शुभांगीचे काका माधो रहेले उपस्थित होते.