अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तींचा कळप आला रे आला..; धुमाकूळाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 02:00 PM2022-11-29T14:00:44+5:302022-11-29T14:05:03+5:30
धान पिकांचे नुकसान
बोंडगावदेवी (गोंदिया) : मागील महिनाभरापासून हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हत्तींचा कळप दररोज आपली दिशा बदलवत नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांसह गावकरीसुद्धा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तींचा कळप आला रे आला चा सूर ऐकायला येत असून गावकऱ्यांची यामुळे झाेप उडाल्याचे चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कवठा खैरी सुकळी, कुंभीटोला,येरंडीदरे, रामघाट या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून हत्तींच्या कळपाचा वावर आहे. या कळपाने आपला मोर्चा रविवारी (दि. २७) बाराभाटी रेल्वे क्रॉसिंग ओलांडून अरततोंडी, दाभना, पिंपळगाव, खांबी, इंजोरीकडे वळविला. या परिसरातील शेतातील धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यानंतर या कळपाने आपला मोर्चा सोमवारी सोमलपूर-इंजोरीमार्गे भिवखिडकीकडे वळविल्याची माहिती आहे.
या कळपाने इंजोरी, निंबाेळी, बाक्टी, भागी या परिसरातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. हत्तींच्या कळपाचा वावर याच परिसरात असल्याने आणि सध्या खरिपातील धानाची कापणी व मळणी सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी हत्तींच्या कळपामुळे शेतीची कामे रविवारपासून बंद केली असल्याची माहिती आहे. हत्तींचा कळप दररोज आपला मार्ग बदलत असून धानपिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांसह गावकऱ्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
....................
वन विभागाच्या चमूची तारांबळ
हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी वन आणि वन्यजीव विभागाच्या ४० ते ४५ कर्मचाऱ्यांची चमू मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने या भागात गस्त देत आहे. मात्र हा कळप दररोज आपला मार्ग बदलवत असल्याने त्यांचीसुद्धा चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.
तोंडचा घास हिरावला
आधी नैसर्गिक संकटाने आणि आता हत्तींच्या कळपाने शेतामध्ये धुमाकूळ घालून पिकांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.