शहरात हत्तीरोगाचा संशयित रूग्ण
By Admin | Published: August 16, 2014 11:33 PM2014-08-16T23:33:08+5:302014-08-16T23:33:08+5:30
जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप वाढतच जात असताना आता शहरात हत्तीरोगाचा एक संशयित रूग्ण आढळला आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ माजली असून यावरून नगर पालिका
वसंतनगरातील इसम : न.प.व हिवताप विभागाचा गलथान कारभार
गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप वाढतच जात असताना आता शहरात हत्तीरोगाचा एक संशयित रूग्ण आढळला आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ माजली असून यावरून नगर पालिका व हिवताप अधिकारी कार्यालयाचा गलथान कारभार पुढे येत आहे. शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे पालिकेकडून किती फवारणी करण्यात आली हे उघडकीस येते.
जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरियाने चांगलाच उच्छाद मांडला आहे. गावागावांत डेंग्यू व मलेरिया पसरला असून काहींचा तर जीव सुद्धा गेला आहे. डासजन्य आजारांचा वाढता प्रकोप बघता फवारणी करणे गरजेचे असते. मात्र गावचे गावच आता डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात येत असल्याने ग्रामीण भागात हिवताप कार्यालयाकडून सुरक्षेच्या किती उपाययोजना करण्यात आल्या हे दिसून येते. हा सर्व प्रकार सुरू असतानाच आता शहरात हत्तीरोगाचा एक रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
शहरातील वसंतनगरातील निवासी मधुकर बेहलपांडे यांना मंगळवारी (दि.१३) रात्री अचानक ताप आला. तसेच त्यांच्या जांघेत गाठ आली व डावा पाय लाल होऊन सूजला आहे. हत्तीरोगाचे सुद्धा हेच लक्षण असल्याचे हिवताप विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून बेहलपांडे यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचा संशय बळावला आहे.
पावसाळ्यात डासजन्य आजार फोफावतात व त्यादृष्टीने फावरणीची गरज असते. फवारणीच्या माध्यमातूनच डासांची उत्पत्ती व त्यांचा नायनाट शक्य आहे. मात्र बेहलपांडे हे सध्या तरी हत्तीरोग संशयीत असल्याने पालिकेच्या सफाई विभागाने किती तत्परतेने शहरात फवारणी केली हे उघड होते. तर महत्वाची बाब म्हणजे शहरवासीयांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या कार्यप्रणालीवरही यातून प्रश्न चिन्ह उभा होतो. त्यातही महत्वाची बाब म्हणजे वसंतनगर हा भाग विद्यमान नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या प्रभागात येतो. यावर हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लक्षणे हत्तीरोगाचीच असल्याने रात्री कर्मचारी त्यांच्या घरी पाठवून रक्ताचे नमूने घेतो. अहवालात स्पष्ट झाल्यावर त्वरीत त्यांच्यावर उपचार सुरू करणार असल्याचे सांगीतले. (शहर प्रतिनिधी)