सालेकसा तालुक्यात सर्वाधिक ८१.२ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:22+5:302021-09-14T04:34:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत असल्याने पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत असल्याने पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. तर लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील सिंचन क्षमतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास जिल्ह्यावरील पाणी टंचाईचे संकट टळले आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक ८१.२ मि. मी. पावसाची नोंद सालेकसा तालुक्यात झाली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने धानपीक वाळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे यंदा कोरडा दुष्काळ पडतोय की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती तर पावसाअभावी उष्ण-दमट वातावरणामुळे धानपिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पिके संकटात आली होती. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने नदी-नाले भरुन वाहत असून, पिकांनासुध्दा संजीवनी मिळाली आहे. सततच्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून, मोठ्या प्रकल्पांमध्ये ८० टक्केच्या वर पाणीसाठा आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात ३६.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ८१.२ मि. मी. पाऊस सालेकसा तालुक्यात झाला आहे.
.......
जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस
१. गोंदिया : ३९.४ मिमी
२. आमगाव : ४९.१ मिमी
३. तिरोडा : २७.१ मिमी
४. गोरेगाव : ३९.५ मिमी
५.सालेकसा : ८१.२ मिमी
६. देवरी : १९.८ मिमी
७. अर्जुनी/मोरगाव : २२.१ मिमी
८ सडक/अर्जुनी : २३.७ मिमी
................................................
एकूण सरासरी : ३६.१ मिमी
......................................
सरासरीच्या ८३ टक्के पाऊस
जिल्ह्यात १ जून ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १,२२० मि. मी. पाऊस पडतो. तर १ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत १,१०७.७ मि. मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत १,०१८. १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरी ८३.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
...............
सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा
संजय सरोवर : ८१.९४ टक्के
सिरपूर : ५०.९९ टक्के
कालीसरार : ९२.८० टक्के
पुजारीटोला : ९४.५१ टक्के
इटियाडोह : ४८.८४ टक्के
मध्यम प्रकल्प : ४९.६८ टक्के
लघु प्रकल्प : ३०.६९ टक्के
.......................................