जिल्ह्यात सर्वाधिक मतदान आमगाव तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:18+5:302021-01-17T04:25:18+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यात सर्वाधिक ८३.१३ टक्के ...
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यात सर्वाधिक ८३.१३ टक्के मतदान आमगाव तालुक्यात झाले. शहरीभागापेक्षा नक्षलप्रभावित तालुक्यांमध्ये ८० टक्केच्या वर मतदान झाले आहे.
राजकारणातील प्रवेशाची पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील मुदत पूर्ण झालेल्या १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १८९ ग्रामपंचायतींच्या एकूण १६९३ जागांपैकी ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १३८२ जागांसाठी ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यासाठी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यासाठी ७९.८३ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण १ लाख २६ हजार १४४ महिला मतदार तर १ लाख २५ हजार ६०४ पुरुष मतदार अशा एकूण २ लाख ५१ हजार ७१८ मतदारांनी मतदान केले. तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सर्वाधिक ८३.१३ टक्के मतदान आमगाव तालुक्यात झाले आहे. नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचंड उत्साह दिसून आला.
......
आता लक्ष विजयाच्या सुपर मनडेकडे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण १३८२ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ३१५१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. या सर्वांच्या भाग्याचा फैसला सोमवारी होणार असल्याने कोणत्या उमेदवारांसाठी तो विजयाचा सुपर मनडे ठरतो याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
............
गावकारभाराची सूत्रे कुणाकडे ?
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही विजयी उमेदवारांना आपल्या गावकारभाराची सूत्रे नेमकी कुणाकडे जातात, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
........
उमेदवार गुंतले विजयाच्या समीकरणात
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळेस प्रथमच मतदानानंतर दोन दिवसांनी निकाल लागणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना गावात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून आपल्याला नेमकी किती मते मिळाली असतील याचा अंदाज घेण्यास वेळ मिळाला आहे. त्यामुळे उमेदवार सध्या आपल्या विजयाची गोळाबेरीज करण्यात गुंतले असल्याचे चित्र आहे.
......
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची अंतिम टक्केवारी
तालुका अंतिम टक्केवारी
गोंदिया ७८.२०
तिरोडा ७९.८०
गोरेगाव ८०.३७
देवरी ७७.५२
आमगाव ८३.१३
सालेकसा ७९.८२
अर्जुनी मोर ८१.२५
सडक अ ८०.२५
..............................
एकूण ७९.८३