Lok Sabha Election 2019; लोकसभेच्या रिंगणात उच्चशिक्षित उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:10 PM2019-04-01T22:10:54+5:302019-04-01T22:12:56+5:30
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे.
राजकीय क्षेत्रात कॅरीअर घडविणारे कमीच. नेत्यांच्या मागे लागून काहीतरी फलीत होईल असे नेहमी कार्यकर्त्यांना वाटत असते. मात्र ऐन निवडणुकीत उभे राहणारे व विचार करणारे वेगळेच असतात. त्यातही शिक्षित व अल्पशिक्षीतांचा भरणा असतो. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. १४ पैकी ११ उमेदवार उच्चशिक्षित आहेत. या निवडणुकीत उच्च शिक्षितांनी आपले कौशल्य पणाला लावले असून आता मतदार कुणा उच्चशिक्षिताला लोकसभेत पाठवितात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यंदा मतदारांना उच्चशिक्षित उमेदवार मिळाले आहेत. मात्र राजकारणाच्या अखाड्यात हे उच्चशिक्षित उमेदवार आपली बुध्दी कशी पणाला लावतात आणि मतदारांना कसे आकर्षित करतात हे महत्वाचे आहे.
कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात उमेदवार म्हणून उभे असलेल्यापैकी कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर आहे. विशेष म्हणजे यापैकी दोन उमेदवार सेवानिवृत्त कर्मचारी असून उच्च शिक्षीत आहेत. सात उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. तीन उमेदवार पेशाने अभियंते आहेत. दोन उमेदवार विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत. यापैकी दोनच उमेदवार अल्प शिक्षीत असून एक बारावी तर एक नववी उत्तीर्ण आहे.
वयाची पन्नाशी गाठलेले आठ उमेदवार
निवडणुक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशिल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापैकी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या रणसंग्रामात १४ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यापैकी सर्वात तरुण उमेदवार हा २९ वर्षांचा आहे. वयस्क उमेदवार हे ६८ वर्षांचे आहे. काही निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे.