महामार्ग बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:31+5:302021-05-30T04:23:31+5:30
रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर ...
रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका
आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहे. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत या बांधकामावर नियंत्रण असणारा विभाग निद्रावस्थेत दिसतो. त्यामुळे संपूर्ण बांधकाम रखडले असून, रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकामही रखडले आहे.
राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४३ चे देवरी ते आमगावपर्यंतचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. परंतु बांधकाम करण्यासाठी ही कंपनी बनवाबनवी करीत आहे. कंपनीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वत:ची कार्यक्षमता नसल्याने आता हे बांधकाम करण्यासाठी पेटी कान्ट्रॅक्ट ठरवून अनेक कंत्राटदारांना दिले आहे.. महामार्ग बांधकाम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना टप्प्यात विक्री करून बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे हे बांधकाम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड आहे..
बांधकाम संथ गतीने सुरू असल्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बांधकाम सुरू असताना उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, श्वसनाचे आजार फोफावला आहेत. परंतु संबंधित कंत्राटदार उडणाऱ्या धुळीवर पाणी मारण्यासही हयगय करीत आहे.
राष्ट्रीय राज्यमार्ग ३६३ वर शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम आमगाव रेल्वेस्थानक ते लांजी महामार्गपर्यंतचे आहे. या कंपनीने स्थानिक कंत्राटदारांना टप्प्याटप्प्याने बांधकाम पेटी स्वरूपात विक्री करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावरील शाश्वती पणाला लागली आहे. रस्ते बांधकामात अनियमितता सुरू असून, कामांचा दर्जा खालावला असल्याचे दिसून येत आहे.
महामार्गावरील रस्ते बांधकाम कंत्राटदाराला उघडे पाडत असून, यातील दर्जा किती निकृष्ट आहे याची प्रचिती समोर येत आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्ते आणि नाली बांधकाम करताना अनेक ठिकाणी नाली व रस्ते जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम होताच तुटून पडले आहे. या महामार्गावरील रस्ते व नाल्याचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. हे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कंपनीने पावले उचलणे आवश्यक असताना बांधकामात दिरंगाई आढळून येत आहे. त्यामुळे नाल्यांमधून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी परिसरातील लोकवस्तीत शिरून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बांधकामाची चौकशी करावी व बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.