हिलटॉप गार्डनचा पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:56 PM2018-03-19T21:56:03+5:302018-03-19T21:56:03+5:30
प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेल्या हिलटॉप गार्डनच्या विकासाचा विडा नवेगावबांध फाऊंडेशनने उचलला.
आॅनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेल्या हिलटॉप गार्डनच्या विकासाचा विडा नवेगावबांध फाऊंडेशनने उचलला. आकर्षक बगिचा तयार झाला मात्र हे नवेगावबांधच्या प्रशासनाला पाहवले नाही. त्यांनी या गार्डनला शासकीय खर्चाने पाणी पुरवठ्यापोटी होणाऱ्या वीज खर्चाची मागणी करुन पाणी पुरवठाच बंद केला. पाणी पुरवठ्याअभावी गार्डनवर संकट ओढवले आहे. प्रशासन व नवेगावबांध फाऊंडेशनच्या या कलगीतुºयात ग्रामपंचायतनेही उडी घेतल्याने हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती १२ नोव्हेंबर १९७५ रोजी झाली. नवेगावचा परिसर वनस्पती सृष्टी, वन्यजीव सृष्टी व पक्षीसृष्टी यांनी समृद्ध व बहरलेला होता. १९७५ ते १९९० च्या काळात उद्यानाची भरभराट झाली. उदयानापेक्षाही उद्यानाच्या संकुल परिसरातील विकसित बगीच्या, लहान मुलांची खेळणी, निसर्गरम्य तलाव, संजय कुटी, हिलटॉप गार्डन हे पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावत होते. मात्र हळूहळू यावर अवकळा आली. मनोहर गार्डन व हिलटॉप गार्डन हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतय होते. ते नेस्तनाबूत झाले आहेत.
राष्ट्रीय उद्यान संकुल परिसराला गतवैभव मिळवून देण्याच्या उद्देशाने नवेगावबांध येथील हौसी युवकांनी नवेगावबांध फाऊंडेशनची निर्मिती केली. या माध्यमातून नजीकच्या पर्यटनप्रेमी तसेच स्वत:कडून पैशाची जुळवाजुळव केली व संकुल परिसरातील रस्त्यावर मुरुम, ओसाड बगिच्यांतील वाढलेली झाडेझुडपे व इतर ठिकाणी स्वच्छता केली. हिलटॉप बगिच्यात नवनवीन फुलझाडे लावली. हे प्रशासनाला खपवत नव्हते. मात्र विरोध वाढला म्हणून ही कामे करेपर्यंत ते गप्प बसले. हिलटॉप गार्डन आता खऱ्या अर्थाने बहरला. येथे अनेक लोकप्रतिनिधी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी दिल्या.
हिलटॉप गार्डन सुद्धा वन विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. येथे या विभागाने गार्डनचा विकास करणे अपेक्षित होते. मात्र ते त्यांनी केले नाही. नवेगावबांध फाऊंडेशनने फुलझाडे व इतर शोभीवंत झाडे लावली. या ठिकाणचा विद्युत मिटर व पाणीपुरवठा मिटर वनपरीक्षेत्राधिकारी (स्वागत) यांचे नावे आहे. माहे सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ३३ हजार १०० रुपयाचे विज देयक आले. या गार्डनसाठी फाऊंडेशनने पाणीवापर केला. यासाठी पाणी पुरवठ्याचा अर्धा अधिकार १६ हजार ५५० रुपये नवेगावबांध फाऊंडेशनने त्वरित भरणा करावा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असे पत्र नवेगावबांध राष्टÑीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (स्वागत) यांनी फाऊंडेशनला दिले आहे. या पत्रामुळे विकासासाठी झपाटलेल्या नवेगावबांध फाऊंडेशनच्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. या युवकांनी टँकरद्वारे बगिच्याला पाणी देण्याचे काम सुरु केले. मात्र त्यांनी या पत्राला भिक घातली नाही. यासंदर्भात वनविकास महामंडळाचे चिचगडचे वनपरिक्षेत्राधिकारी ढवळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मी बाहेर आहे. नंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली.
पालक मंत्र्याच्या भूमिकेकडे लक्ष
एकीकडे शासन व प्रशासनाची संकुल परिसराच्या विकासाविषयी अनास्था आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी लोकसहभागातून या परिसराच्या विकासाचा विडा उचलला तर त्यांचे पाय खेचल्या जात आहेत. यावर लोकप्रतिनिधी सुद्धा मुंग गिळून गप्प आहेत. हा परिसर पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांचे मतदार संघातल आहे. ते यावर तोडगा काढतील काय अशी विचारणा पर्यटनप्रेमी करीत आहेत.
ग्रा.पं. दिले वनविभागाला पत्र
प्रशासन व नवेगावबांध फाऊंडेशनच्या या कलगीतुºयात आता ग्रामपंचायतने उडी घेतली आहे. नवेगावबांधचे सरपंच अनिरुदध शहारे यांनी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, तसेच वनपरिक्षेत्राधिकारी (स्वागत) यांना १० मार्च रोजी एक लेखी पत्र दिले आहे. यात हे पर्यटन संकुल ग्रामपंचायतीच्या महसुली जागेत असून याचे व्यवस्थापन आपणाकडे दिले आहे. येथील हिलटॉप गार्डनची दुरावस्था लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत लोकसहभागातून गार्डनची दुरुस्ती करुन सुशोभित केले. मात्र या गार्डनला होणारा पाणीपुरवठा आपण बंद केला. तो विना अटीशर्तीने अविलंब सुरु करावा अन्यथा बगिच्याच्या होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरण्यात येईल असे पत्र दिले आहे. त्यामुळे आता हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
वनविभागाने २०१३ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा संकुल परिसर वन विकास महामंडळाला हस्तांतरीत केला आहे. या परिसराच्या विकासासाठी योजना राबवत असताना पाण्याचे बिल त्यांनी भरला पाहिजे. मात्र ते भरणा करीत नाही. त्यांनी पाणी पुरवठा बंद करण्यास सांगितले. ही बाब आम्ही वरिष्ठांना कळविली. त्यांनी पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितल्याने बंद करण्यात आला. वरिष्ठांनी आदेश दिल्यास लगेच पुरवठा करण्यात येईल.
- पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी (स्वागत),
राष्ट्रीय उद्यान, नवेगावबांध